मुठा कालव्याला भगदाड; पुण्यात पाणीच पाणी
सकाळी 11वाजता पुण्यातील पार्वती भागात मुठा नदीच्या कालव्याला अचानक भगदाड पडून, भर उन्हात पूरपरिस्थिती निर्माण झाली.
सकाळी 11वाजता पुण्यातील पार्वती भागात मुठा नदीच्या कालव्याला अचानक भगदाड पडून, भर उन्हात पूरपरिस्थिती निर्माण झाली. जनता वसाहत जवळून जाणारा मुठा कालवा फुटून दांडेकर पुलावर लाखो लिटर पाणी वाया गेल्याचे दिसून आले, यामुळे दांडेकर पूल आणि परिसरात पाणीच-पाणी झाल्याने नागरिकांची प्रचंड तारांबळ उडाली. अचानक उद्भवलेल्या घटनेमुळे परिसरातील संपूर्ण वाहतूक ठप्प झाली असून, रस्त्याला नदीचे स्वरूप आल्याने दुचाकी आणि चारचाकी गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
पाण्याचा जोर इतक्या जास्त प्रमाणात होता की नागरिकांच्या घरात या कालव्याचे पाणी शिरले. यामुळे परिसरातील लोकांचे फारच नुकसान झाले. कालव्याचे पाणी घरात शिरायला सुरुवात झाल्यानंतर जवळजवळ 1 तास या परिसरात कोणीच फिरकले नाही. याचा राग नागरिकांनी पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांच्यावर काढला. परिस्थिती पाहण्यास मुक्ता टिळक आल्या असता, ‘मतं मागायला येता, मदतीला कधी येणार?’ असा प्रश्न नागरिकांकडून विचारला गेला. नागरिकांचा संताप इतका जास्त होता की महापौरांना तिथून काढता पाय घ्यावा लागला.
सध्या या परिसरात बचात्कार्य सुरु असून, आजूबाजूच्या ज्या झोपडपट्टीत पाणी शिरलंय, त्या भागात पंचनामे करुन मदत दिली जाईल, असे आश्वासन पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिलं.