पुण्यातील वैशाली-रुपाली-गुडलकसह अनेक प्रसिद्ध रेस्टॉरंट्स ठरली अस्वच्छतेत नंबर 1

फूड्स अॅण्ड ड्रग्स विभागाने टाकलेल्या धाडीत पुण्यातील अनेक लोकप्रिय हॉटेल्समध्येही स्वच्छतेचे निकष पाळले जात नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

वैशाली रेस्टॉरंट (Photo Credit : Sid The Wanderer)

नुकतेच अस्वच्छेतेच्या कारणावरून ऑनलाईन फूड कंपन्यांनी तब्बल 10,000 हॉटेल्सना आपल्या यादीतून वगळल्याचा प्रकार ताजा असताना, एफडीए (फूड्स अॅण्ड ड्रग्स) विभागाने टाकलेल्या धाडीत पुण्यातील अनेक लोकप्रिय हॉटेल्समध्येही स्वच्छतेचे निकष पाळले जात नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

पुण्यामधील फर्ग्युसन रस्ता हा खवय्यांसाठी चंगळच आहे. या रस्त्यावरील रुपाली, वैशाली आणि गुडलक तर पुण्याची शान म्हणावी लागेल. सकाळच्या मॉर्निंग वॉकनंतरच्या पहिल्या नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत या हॉटेल्समध्ये पडीक असणाऱ्या मंडळींची संख्या काही कमी नाही. ग्राहकांच्या इतक्या मोठ्या प्रमाणामुळे, अशा हॉटेल्समधून सर्व्ह होणारे खाद्यपदार्थ आणि हॉटेल्स यांवर स्वच्छतेसंदर्भात काही निकष एफडीएकडून घालून देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी असणा-या शहरातील सर्वोत्तम दहा (टॉप टेन) हॉटेल्सची तपासणी करावी, अशा सुचना अन्न व औषध प्रशासन विभागाच्या मुख्य कार्यालयाकडून देण्यात आला आहेत. त्यानुसार नुकत्याच एफडीएने केलेल्या तपासणीत पुण्यातील या प्रसिद्ध हॉटेल चालकांकडून एफडीएच्या स्वच्छतेचा निकषाचे पालन केले जात नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

वैशालीमध्ये केल्या गेलेल्या तपासणीत किचनमध्ये सर्वत्र कचरा आढळून आला, अन्नपदार्थ बनवण्यासाठी वापरण्यात येणारे चमचे, वाडगी इत्यादी भांडीही अस्वच्छ असल्याचे निदर्शनास आले. इथला फ्रीज बरेचदिवसापासून साफ केला गेला नसल्याचे आढळले, मुख्य म्हणजे बरेच दिवस किचनमध्ये पेस्ट कंट्रोलही झालं नसल्याचं उघड झालं. यावर भर म्हणजे एफडीएने दिलेले कोणतेही स्वच्छतेचे सर्टिफीकेट हॉटेलकडे नव्हते. अगदी हीच परिस्थिती रुपालीची होती.

हद्द म्हणजे कॅफे गुडलकमधील किचनच बरेच दिवस झाडले गेले नव्हते. इथे भिंतींवर सर्वत्र कोळ्यांची जाळी होती. स्वयंपाकाची भांडीही बरेच दिवस धुतली नव्हती. विशेष म्हणजे ताजे खाद्यपदार्थ उघड्यावर ठेवले होते.

एफडीएकडून जाहीर करण्यात आलेले स्वच्छतेचे निकष

> अन्न परवाना दर्शनी ठिकाणी लावणे

> हॉटेल्समधील कामगारांची आरोग्य तपासणी करणे

> वेळच्यावेळी पेस्ट कंट्रोल करणे

> पाण्याची टाकी स्वच्छ करणे

> शाकाहारी व मांसाहारीसाठी वेग वेगळी व्यवस्था करणे

> ओला व सुका कचरा टाकण्यासाठी दोन वेगळ्या पेट्या ठेवणे

> भांडी धुण्याची जागा स्वच्छ ठेवणे

> वेटर्सने डोक्यात टोपी घालणे

> अन्न तयार करण्याच्या जागेची स्वच्छता राखणे

एफडीएने केलेल्या तपासणीमध्ये नापास झालेल्या हॉटेल्समध्ये वैशाली, रूपाली, कॅफे गुडलक, सिझलर्स, मॉडर्न कॅफे, गंधर्व रेस्टॉरन्ट, शुभम आणि पांचाली रेस्टॉरन्टचा समावेश होतो. या सर्व हॉटेलांना एफडीएने नोटीस दिली आहे. यावर या सर्व हॉटेल्सनी एफडीएच्या सर्व निकषांची पूर्तता करणे बंधनकारक असणार आहे.