पुणे: पिंपरी येथे दाताच्या शस्त्रक्रियेदरम्यान 19 वर्षीय तरुणीचा मृत्यू; रुग्णालय प्रशासनाने जबाबदारी नाकारली
दातांची शस्त्रक्रिया सुरु असताना अतिरक्तस्त्राव झाल्याने एका तरुणीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पिंपरी येथे घडली आहे.
दातांची शस्त्रक्रिया सुरु असताना अतिरक्तस्त्राव झाल्याने एका तरुणीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पिंपरी (Pimpari) येथे घडली आहे. धनश्री जाधव असं या मृत मुलीचं नाव असून ती 19 वर्षांची होती. या प्रकरणात शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर पाटील दाम्पत्य संध्या संपर्कात नाहीत. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मुलीला प्राण गमवावे लागले असल्याचे आरोप नातेवाईकांनी केले आहेत.
धनश्रीला दातांमध्ये जन्मजात दोष (Crouzon's Syndrome) होता. त्यावर पिंपरी चिंचवड येथील आयुर्वेद स्टर्लिंग हॉस्पिटलचे डॉक्टर राम पाटील आणि अनुजा पाटील यांनी शस्त्रक्रिया करुन दोष दूर करणार असल्याचे सांगितले. त्यासाठी धनश्रीवर 23 एप्रिल रोजी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.
दुपारी 12 वाजता शस्त्रक्रिया सुरु झाली. मात्र 12 तास झाले तरी शस्त्रक्रिया सुरुच होती. दरम्यान तिच्या नाका-तोंडातून अतिरक्तस्त्राव सुरु झाला आणि तिला आयसीयूत दाखल करावे लागले. आयसीयूत उपचार सुरु असताना रक्तदाब कमी झालं आणि ब्रेन डेड झालं. अखेर 24 एप्रिल सकाळी धनश्रीने प्राण सोडले.
या सर्व प्रकरणानंतर रुग्णालय प्रशासनाने दंत विभाग सील केला असून डॉ. पाटील दाम्पत्याला हे चिकित्सालय रुग्णालयाने भाडे तत्वावर दिलं असल्याची माहिती आहे. त्यामुळे भाडे कराराशिवाय पाटील दाम्पत्याचा आणि आमचा संबंध नसल्याचे रुग्णालय प्रशासनाने म्हटले आहे. मात्र डॉक्टर पाटील दाम्पत्याचा हलगर्जीपणा मुलीच्या जीवावर बेतल्याचा आरोप नातेवाईक करत आहेत.