Pune Tourist Spots: सध्याच्या काळात बाहेर फिरायला जाणे पडू शकते महागात; पुण्यात 50 पर्यटन स्थळांवर बंदी

या आदेशामध्ये लोणावळ्याजवळील भुशी धरण, लवासा, टेमघर धरण, पानशेत, खडकवासला धरण, सिंहगड, शिवनेरी, तोरणा, लोहगड या किल्ल्यांसारख्या लोकप्रिय ठिकाणांचा तसेच पर्यटक वारंवार येत असणाऱ्या ठिकाणांचा समावेश आहे

शनिवारवाडा (PC - Facebook)

गेल्या काही आठवड्यांपासून राज्यातील कोविड-19 (Coronavirus) प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून राज्य शासनाने अनेक निर्बंध लागू केले आहेत. मात्र अजूनही नियमांचे पालन होत नसल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रातील पुणे (Pune) जिल्ह्यातील प्रशासनाने 50 हून अधिक पर्यटन स्थळांसाठी (Tourist Spots) प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. एका अधिकाऱ्याने मंगळवारी याबाबत माहिती दिली. यामध्ये अनेक लोकप्रिय पर्यटन स्थळे सामील आहेत.

फौजदारी प्रक्रिया संहिता (CRPC) कलम 144 अन्वये पाच किंवा त्याहून अधिक व्यक्तींच्या गटांना पर्यटन स्थळांच्या एक किलोमीटर परिसरात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे, अशी माहिती पुणे ग्रामीण पोलिसांनी मंगळवारी दिली. जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी एका कार्यकारी आदेशात नमूद केले आहे की, यामध्ये हिल स्टेशन्स, धबधबे, धरण जलाशय तलाव आणि किल्ल्यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील मावळ, मुळशी, हवेली, आंबेगाव, जुन्नर, भोर आणि वेल्हा या सात तालुक्यांतील पर्यटन स्थळांवर प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत.

या आदेशामध्ये लोणावळ्याजवळील भुशी धरण, लवासा, टेमघर धरण, पानशेत, खडकवासला धरण, सिंहगड, शिवनेरी, तोरणा, लोहगड या किल्ल्यांसारख्या लोकप्रिय ठिकाणांचा तसेच पर्यटक वारंवार येत असणाऱ्या ठिकाणांचा समावेश आहे. लोक या ठिकाणांना मोठ्या संख्येने भेट देतात. विकेंडला तर लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. अशावेळी सामाजिक अंतर आणि मास्क यासंबंधी मार्गदर्शक तत्त्वे पाळली जात नाहीत, त्यामुळे अनेक पर्यटन स्थळेच बंद करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. (हेही वाचा: Pune Metro Update: पुणे मेट्रोचा उद्घाटनाचा कार्यक्रम ढकलला पुढे, कोविड-19 प्रकरणांमध्ये वाढ झाल्याने घेतला निर्णय)

दरम्यान, सोमवार, दि. 10 जानेवारी 2022 नुसार, 3,067 रुग्ण आढळून आले असून एकूण रुग्णांची संख्या 5,29,102 झाली आहे. सध्या पुण्यात 17,098 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.