Pune: पुण्यात अटक झालेला संशयित दहशतवादी होता Lashkar-e-Taiba च्या सदस्यांच्या संपर्कात; जम्मू काश्मीरमधील नंबरवर झाले अनेक कॉल्स
जुनैदने पुण्यातील कोणत्याही महत्त्वाच्या प्रतिष्ठानांना भेट दिली आहे की नाही हे तपासण्यासाठी गेल्या काही आठवड्यांपासूनच्या त्याच्या हालचाली आणि परस्परसंवादाचा शोध घेतला जात आहे.
पुण्यात (Pune) अटक करण्यात आलेला संशयित दहशतवादी जुनैद मोहम्मद अता मोहम्मदच्या (Junaid Mohammed Ata Mohammed) फोनची प्राथमिक तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये दिसून आले आहे की त्याची जम्मू आणि काश्मीरमधील नंबरवर मोठ्या प्रमाणत कॉल्सची देवाणघेवाण झाली आहे. चौकशीत असेही समोर आले आहे की, तो लवकरच जम्मू-काश्मीरला रवाना होणार होता पण तसे करण्यापूर्वी त्याला अटक करण्यात आली. जुनैद (28) हा मूळचा बुलढाणा येथील असून सध्या तो पुण्यात राहत होता.
जुनैदला महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाच्या पुणे युनिटने मंगळवारी अटक केली. त्याच्याकडून संशयास्पद हालचालींची माहिती मिळाल्यानंतर तो गेल्या वर्षी डिसेंबरपासून एटीएसच्या रडारवर होता. याबाबत एटीएस अधिकाऱ्याने सांगितले की, ‘जेव्हा आम्ही त्याला अटक केली तेव्हा त्याचा फोन जप्त केला, त्यानंतर त्याचे कॉल लॉग तपासले असता, गेल्या काही महिन्यांत त्याने मोठ्या प्रमाणात जम्मू-काश्मीरमधील नंबरवर केलेले आणि प्राप्त झालेले कॉल्स आढळले.’
त्यांनी पुढे सांगितले की, ‘या कॉल्सबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी आम्ही जुनैदची चौकशी करत आहोत आणि त्याचे नोंदणी तपशील तसेच तो संपर्कात असलेल्या नंबरचे कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR) देखील मागितले आहेत.’ एटीएसने मंगळवारी न्यायालयात सादर केलेल्या रिमांड अर्जात जुनैद जम्मू-काश्मीरमधील लष्कर-ए-तैयबाच्या सक्रिय सदस्यांच्या संपर्कात असल्याचे म्हटले आहे.
अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, ‘आतापर्यंतच्या तपासात जुनैद लवकरच जम्मू-काश्मीरला जाऊन तिथे त्याच्या हँडलरला भेटणार होता, असे दिसून आले आहे. ‘गेल्या दोन महिन्यांत वाढलेला संवाद आणि त्याच्या हँडलर्सना भेटण्याच्या त्याच्या योजनांमुळे आम्हाला शंका आहे की, त्याला लवकरच एक मिशनवर नियुक्त केले जाणार होते.’ (हेही वाचा: Underworld don Dawood Ibrahim पाकिस्तानच्या कराची मध्ये; भाचा Alishah Parkar ची ईडीला माहिती)
ते म्हणाले, ’जुनैदने पुण्यातील कोणत्याही महत्त्वाच्या प्रतिष्ठानांना भेट दिली आहे की नाही हे तपासण्यासाठी गेल्या काही आठवड्यांपासूनच्या त्याच्या हालचाली आणि परस्परसंवादाचा शोध घेतला जात आहे. कारण अशी ठिकाणे सहसा दहशतवादी हल्ल्यांसाठी निवडलेले लक्ष्य असू शकतात.’ जुनैद चालवत असलेली पाच फेसबुक खातीही एटीएसने तपासली असून त्यात अलीकडच्या काळात अनेक क्रियाकलाप आढळून आले आहेत.