पुणे: राज्यात कोरोना व्हायरस संक्रमीत रुग्णांची संख्या १४ वर पोहोचली; पिंपरी चिंचवड येथे नव्याने 3 जणांना Covid-19 ची लागण
या पाचपैकी 3 जणांची चाचणी ही पॉझिटिव्ह आली आहे. इतर तिघांची चाचणी निगेटिव्ह आली. त्यामुळे या तिघांना काळजी घेण्यास सांगून घरी पाठविण्यात आले आहे. तर, नव्याने आढळलेल्या 3 रुग्णांना वायसीएम रुग्णालयात विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.
कोरोना व्हायरस (Coronavirus) बाधित रुग्णांची महाराष्ट्रातील संख्या हळूहळू वाढताना दिसत आहे. पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) येथे कोरोना व्हायरस (Covid-19 बाधित 3 नवे रुग्ण सापडल्याने ही संख्या आता 14 वर पोहोचली आहे. कोकणातील रत्नागिरी आणि आणखी एका ठिकाणीही 2 जणांमध्ये कोरोना व्हायरसची लक्षणे आढळली आहेत. कोकणातील काही लोक नेपाळ येथील काटमांडू येथे सहलीला गेले होते. मुंबई, नागपूर येथेही कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे संशयीत रुग्ण सापडले आहेत.
पिंपरी चिंचवड येथील वायसीएम रुग्णालयात 5 संशयित रुग्णांची चाचणी करण्यात आली होती. या पाचपैकी 3 जणांची चाचणी ही पॉझिटिव्ह आली आहे. इतर तिघांची चाचणी निगेटिव्ह आली. त्यामुळे या तिघांना काळजी घेण्यास सांगून घरी पाठविण्यात आले आहे. तर, नव्याने आढळलेल्या 3 रुग्णांना वायसीएम रुग्णालयात विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. असे महाराष्ट्र टाईम्सने आपल्या वृत्तात म्हटले आहे. (हेही वाचा, मुंबई: मुलुंड येथे कोरोना व्हायरस संक्रमीत एकही रुग्ण नाही, अफवांवर विश्वास ठेऊ नये: आमदार मिहिर कोटेचा)
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर जनजागृती आणि खबरदारीचा उपाय म्हणून राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनही आटोपते घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तसेच, नागरिकांनी घाबरुन जाऊ नये. मात्र, काळजी घ्यायला हवी. कोरोना व्हायरसविरोधात लढा देण्यासाठी राज्य सरकारने आवश्यक ती सर्व तयारी केली आहे. तसेच, राज्याचा आरोग्य विभागही सतर्क आहे. आवश्यक तेथे रुग्णालयांमध्ये विशेष यंत्रणा उभारल्याचेही राज्य सरकारने म्हटले आहे.
आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, जगभरात आतापर्यंत सुमारे 1,21,500 हजार नागरिकांना कोरोना व्हायरस बाधा झाल्याचा आकडा आहे. जगभरात 4,300 नागरिकांचा या विषाणूने बळी घेतला आहे. एकट्या चीनमध्येच तब्बल 3,000 नागरिकांचा बळी गेला आहे, असेही प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे. जगभरातील 144 देशांमध्ये कोरोना व्हायरस प्रादूर्भाव आहे. या विषाणूचे मुल्यांकन करताना जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना व्हायरस म्हणजे एक साथीचा आजार असल्याचे म्हटले आहे.