देवाची आळंदी: महाराज भगवान पोव्हणे याच्याकडून बेदम मारहाण; विद्यार्थी 7 दिवस कोमात
या मारहाणीत डोके छाती आणि पोट आदी अवयवांवर जबरी मार लागल्याने विद्यार्थी गंभीर जखमी झाला. ओम चौधरी असे पीडित विद्यार्थ्याचे नाव आहे.
पुणे (Pune) जिल्ह्यातील देवाची आळंदी (Alandi Devachi) येथे अध्यात्मिक संस्थेमध्ये महाराज म्हणून कार्यरत असलेल्या भगवान पोव्हणे (Bhagwan Povhne Maharaj) नामक इसमाने विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याची घटना पुढे आली आहे. धक्कादायक असे की, या मारहाणीमुळे विद्यार्थी तब्बल 7 दिवस कोमात (Coma) गेल्याची माहिती आहे. अध्यात्मिक शिक्षणात असलेला अभ्यास पूर्ण न केल्याने भगवान पोव्हणे याने विद्यार्थ्याला काठीणे बेदम मारल्याची प्राथमिक माहिती आहे. या मारहाणीत डोके छाती आणि पोट आदी अवयवांवर जबरी मार लागल्याने विद्यार्थी गंभीर जखमी झाला. ओम चौधरी असे पीडित विद्यार्थ्याचे नाव आहे.
भगवान पोव्हणे महाराजाकडून झालेल्या मारहाणीत विद्यार्थी गंभीर जखमी झाला. त्याच्या शरीरात अंतर्गत भागात अनेक गंभीर जखमा झाल्या. त्यामुळे विद्यार्थ्याची प्रकृती खालावली. दरम्यान, आपल्या मारहाणीचे बिंग फुटू नये आणि प्रकरण दडपले जावे यासाठी भगवान पोव्हणे हा या विद्यार्थ्याला घेऊन औरंगाबाद येथे एका कार्यक्रमास घेऊन गेला. मात्र तिथे विद्यार्थ्याची प्रकृती अधिकच खालावली आणि तो बेशुद्ध पडला. (हेही वाचा, बीड: बाभळीच्या काट्यावर झोपून भगवान महाराज यांनी दिला निवृत्ती महाराज इंदुरीकर यांना पाठिंबा)
दरम्यान, विद्यार्थी बेशुद्ध पडल्यानंतर भगवान पोव्हणे याने विद्यार्थ्याच्या आईला फोन करुन कल्पना दिली. तुमचा मुलगा प्रचंड आजारी आहे असे सांगितले. त्यानंतर त्याच्या आईने औरंगाबादला धाव घेत मुलाला ताब्यात घेतले आणि रुग्णालयात दाखल केले. हा विद्यार्थीत 7 दिवस कोमात होता. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. कोमातून बाहेर आल्यानंतर विद्यार्थ्याने आपल्याबाबत घडलेला प्रकार सांगितला आणि भगवान पोव्हणे महाराजाचे बिंग बाहेर आले. दरम्यान, पोलिसांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप पीडित विद्यार्थ्याच्या पालकांनी केला आहे.