कातिल सिद्दीकी खून प्रकरणात संशयीत आरोपी शरद मोहोळ आणि अलोक भालेराव यांची निर्दोष मुक्तता

ही घटना 8 जून 2012 रोजी घडली होती. या प्रकरणातील संशयीत आरोप शरद मोहोळ आणि अलोक भालेराव यांची आज निर्दोष मुक्तता करण्यात आली

शरद मोहोळ आणि अलोक भालेराव (संग्रहित-संपादित प्रतिमा)

पुण्यातील येरवडा जेलमध्ये कातिल सिद्दीकी (Mohammad Qateel Siddiqui) याचा नाडीने गळा आवळून खून करण्यात आला होता. ही घटना 8 जून 2012 रोजी घडली होती. या प्रकरणातील संशयीत आरोप शरद मोहोळ आणि अलोक भालेराव यांची आज निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. शिवाजीनगर येथील न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. संशयित दहशतवादी कतिल सिद्दीकी (वय 27) याचा येरवडा कारागृहातील (Yerwada Jail) अतिसुरक्षित समजल्या जाणाऱ्या अंडा सेलमध्ये पायजम्याच्या नाडीने गळा आवळून खून करण्यात आला होता.

हा खून झाल्यानंतर शरद मोहोळ (34) आणि अलोक भालेराव (28) यांना संशयीत आरोपी समजून गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर इतके वर्षे कोर्टात ही केस चालू होती. यासाठी अनेक पुरावे शोधण्यात आले, अनेकांच्या जबाबी पार पडल्या, अखेर पुराव्याअभावी या दोघांचीही निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. खटला चालू असताना काही साक्षीदार फितूर झाले होते.

दरम्यान, कातील सिद्दिकी हा इंडियन मुजाहिदीचा दहशतवादी असल्याचे एटीएसच्या तपासात पुढे आले आहे. तो श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराजवळ बॉम्ब ठेवण्याचा प्रयत्न करणारा संशयित दहशतवादी होता. तर शरद मोहोळ याने 2010 साली किशोर मारणेचा खून केला होता. त्यानंतर 2011 नोव्हेंबरमध्ये सरपंच शंकरराव धिंडले यांचे अपहरण करून 45 लाखांची खंडणी घेतली होती. अशाप्रकारे मोहोळवर खून, दरोडा, जबरी चोरी, अपहरण यासारखे गंभीर स्वरुपाचे आठ गुन्हे दाखल आहेत.