Pune Porsche Accident: आरोपी अल्पवयीन मुलाच्या आजोबांचे Chhota Rajan शी कनेक्शन; भावासोबतच्या वादात घेतली होती गँगस्टरची मदत, खुनाच्या प्रयत्नाचा खटला सुरू

पुढे खुनाच्या प्रयत्नाचा एफआयआर दाखल करण्यात आला. प्रथम पोलिसांनी याचा तपास केला व नंतर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले. सध्या हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे.

Pune Porsche Accident,

महाराष्ट्रातील पुणे पोर्श कार अपघात (Pune Porsche Accident) प्रकरणात रिअल इस्टेट व्यावसायिक अग्रवाल कुटुंब चर्चेत आहे. आता या कुटुंबांबाबत एक नवा धक्कादायक खुलासा समोर आला आहे. अग्रवाल कुटुंबीय आधीपासूनच कायद्याच्या कचाट्यात अडकले आहे. यासोबतच या कुटुंबाचे अंडरवर्ल्ड कनेक्शनही समोर आले आहे. आताच्या कार अपघात प्रकरणात आरोपी असलेल्या अल्पवयीन मुलाचे आजोबा सुरेंद्र कुमार अग्रवाल याने आपल्या भावासोबत झालेल्या संपत्तीच्या वादात अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनची मदत घेतली होती.

या प्रकरणात राजनच्या टोळीकडून गोळीबारही झाला होता. पुढे खुनाच्या प्रयत्नाचा एफआयआर दाखल करण्यात आला. प्रथम पोलिसांनी याचा तपास केला व नंतर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले. सध्या हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. फ्री प्रेस जर्नलने याबाबत वृत्त दिले आहे.

काय आहे प्रकरण?

अहवालानुसार, शिवसेना नेते अजय भोसले यांच्यावर 2009 मध्ये झालेल्या गोळीबारप्रकरणी, गुंड छोटा राजनसह आरोपी मुलाचे आजोबा सुरेंद्र कुमार अग्रवाल याच्यावर मुंबईतील विशेष न्यायालयासमोर खटला सुरू आहे. बँड गार्डन स्टेशन, पुणे येथे नोंदवलेल्या गुन्ह्यानुसार, 11 ऑक्टोबर 2009 रोजी भोसले प्रचारासाठी निघाले असताना दोन मोटारसायकलवरून आलेल्या पुरुषांनी त्यांच्या कारवर गोळीबार केला. यामध्ये भोसले सुखरूप बचावले पण गोळी त्यांचा ड्रायव्हर शकील सय्यद याला लागली. त्यानंतर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला. (हेही वाचा: Pune Porsche Accident: पुणे पोर्श कार अपघात प्रकरण, देवेंद्र फडणवीस यांची नाराजी)

अंडरवर्ल्ड कनेक्शन-

नंतर हल्लेखोरांची ओळख पटली असता, ते राजनचा सहकारी फरीद तनाशाशी निगडीत असल्याचे समोर आले. चौकशीत सुरेंद्र कुमार अग्रवाल याची भूमिका उघड झाली. सुरेंद्रचा त्याचा भाऊ आरके अग्रवाल याच्याशी जमिनीच्या तुकड्यावरून वाद झाला आणि वाद मिटवण्यासाठी त्याने छोटा राजनच्या गुंडाची मदत घेतली. सुरेंद्रने कथित राजनचा सहकारी विजय तांबट याच्यासोबत अनेक बैठकाही घेतल्याचा दावा करण्यात आला. त्यानंतर सुरेंद्रच्या भावाचा जवळचा मित्र भोसले यांच्यावर हल्ला करण्याचा कट आरोपींनी रचला.

न्यायालयात खटला सुरु-

ऑक्टोबर 2015 मध्ये राजनला अटक केल्यानंतर आणि त्याच्या प्रत्यार्पणानंतर, त्याच्याशी संबंधित सर्व प्रकरणे सीबीआयकडे वर्ग करण्यात आली. सीबीआयने मे 2017 मध्ये एक नवीन गुन्हा नोंदवला. त्यानंतर, मुंबईत राजनवर सर्वाधिक गुन्हे दाखल असल्याने, सर्व खटले शहरातील विशेष न्यायालयात हलवण्यात आले. सुरेंद्र अग्रवालचा खटलाही 2020 मध्ये मुंबई न्यायालयात वर्ग करण्यात आला. या खटल्याची सुनावणी गेल्या वर्षी एप्रिलमध्येच सुरू होऊ शकली. सध्या या खटल्यात फिर्यादी पक्षाने 12 साक्षीदार तपासले असून सुरेंद्र जामिनावर बाहेर आहे.

पुणे पोर्श कार अपघात-

दरम्यान, पुण्यात तीन दिवसांपूर्वी एका 17 वर्षीय मुलाने दारूच्या नशेत दोन दुचाकीस्वार अभियंत्यांना आपल्या पोर्श कारने चिरडले होते. अपघातात दोघांचा (मुलगा आणि मुलगी) मृत्यू झाला होता. दोघेही मध्य प्रदेशातील रहिवासी असून पुण्यात कामाला होते. या प्रकरणात बाल न्याय मंडळाने अल्पवयीन आरोपीला काही अटींसह सोडले. त्यानंतर पोलिसांनी आरोपी अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवाल याला छत्रपती संभाजीनगर येथून अटक केली.