Pune New Year Party Invite: काय सांगता? पुण्यात High Spirits Cafe पबने नवीन वर्षाच्या पार्टी निमंत्रणासोबत ग्राहकांना पाठवले Condoms; काँग्रेसने दाखल केली तक्रार

पबची कृती अस्वीकार्य असून पुण्याच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक परंपरांच्या विरोधात असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

Condom Representational picture. (Photo credits: Pixabay)

नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी पब आणि रेस्टॉरंट्स अनेक आकर्षक ऑफर घेऊन येतात. आता पुण्यातील (Pune) हाय स्पिरीट कॅफे (High Spirits Cafe) नामक पबने पार्ट्यांच्या आमंत्रणासोबत ग्राहकांना चक्क कंडोम (Condom) आणि ओआरएस (ORS) पाठवले आहे. ही बाब समोर आल्यानंतर नव्या वादळां तोंड फुटले आहे. पुण्यातील मुंढवा येथे असलेल्या एका रेस्टॉरंट-कम-पबने नवीन वर्षाच्या निमित्ताने आपल्या नियमित ग्राहकांना, मुख्यतः तरुणांना आक्षेपार्ह आमंत्रणे पाठवली आहेत. या निमंत्रणांसोबत कंडोम आणि ओआरएस होते.

याबाबत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे तक्रार दाखल करून, कॅफे व्यवस्थापनावर कठोर कारवाईची मागणी केली आहे. पबची कृती अस्वीकार्य असून पुण्याच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक परंपरांच्या विरोधात असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

तक्रारीत म्हटले आहे, ‘पार्टी आमंत्रणांसह कंडोम वाटपामुळे तरुणांमध्ये चुकीचा संदेश जातो आणि समाजात गैरसमज आणि वाईट सवयी निर्माण होतात. देशाचे शैक्षणिक आणि सांस्कृतिक केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्याचे अशा 'स्वस्त पब्लिसिटी' स्टंटमुळे नुकसान झाले आहे. कॅफे व्यवस्थापनावर कठोर कारवाई करा आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कठोर नियम स्थापित करा.’ एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने रविवारी तक्रार मिळाल्याची पुष्टी केली. ते म्हणाले, आम्ही याबाबत अनेक निमंत्रितांचे जबाब नोंदवले आहेत. (हेही वाचा: Pune New Year’s Eve Traffic Advisory: नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येसाठी पुणे पोलिसांनी जारी केले वाहतूक निर्बंध; फर्ग्युसन कॉलेज रोड, एम.जी. रोड असेल 'नो व्हेईकल झोन')

दरम्यान, नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येसाठी पुणे (Pune) शहर पोलिसांनी जनतेसाठी वाहतूक निर्बंध जारी केले आहेत. हे वाहतूक बदल 31 डिसेंबर रोजी संध्याकाळी 5 वाजल्यापासून जमाव पांगापांग होईपर्यंत लागू होतील. नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी पुणेकर दरवर्षी पब आणि शहरातील रस्त्यांवर गर्दी करतात. यावेळी दारू पिऊन गाडी चालवणे, रॅश ड्रायव्हिंग, ध्वनी प्रदूषण, अल्पवयीन मुलांनी वाहन चालवणे यासारख्या अनेक समस्या उद्भवतात. या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शहर पोलीस दरवर्षी चोख बंदोबस्त ठेवतात. यंदाही नवीन वर्षाचे स्वागत सुरळीत पार पडावे म्हणून पुणे पोलिसांनी कडक व्यवस्था केली आहे.