PMC Election 2022: भाजपचे 16 नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर, NCP शहराध्य प्रशांत जगताप यांचा दावा

पक्षांतराच्या चर्चाही जोर धरु लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांनीही एक दावा करुन राजकीय वर्तुळात जोरदार खळबळ उडवून दिली आहे.

NCP | Photo Credits: Facebook)

पुणे महापालिका निवडणूक 2022 (Pune Municipal Corporation Election 2022) च्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकारण चांगलेच तापले आहे. पक्षांतराच्या चर्चाही जोर धरु लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांनीही एक दावा करुन राजकीय वर्तुळात जोरदार खळबळ उडवून दिली आहे. पुणे महापालिकेतील भाजपचे (BJP) सुमारे 16 नगरसेवक (BJP Corporators) राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाच्या वाटेवर आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याशीही या नगरसेवकांच्या पक्षप्रवेशाबाबत एका बैठकीत चर्चा झाल्याचे जगताप यांनी म्हटले आहे.

पुणे महापालिका निवडणूक तोंडावर आली आहे. त्यामुळे राजकीय पक्षांनी आपापली ताकद वाढवून राजकीय बस्तान अधिक घट्ट करण्यावर भर दिला आहे. सध्या पुणे महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता असून मुरलीधर मोहोळ हे महापौर आहेत. गेली अनेक वर्षे पुणे महापालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता होती. पाठीमागील निवडणुकीत ही सत्ता हिसकावून घेण्यास भाजपला यश आले. अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्री आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा पुणे महापालिकेत सत्ता मिळविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्नशिल आहे.

नाशिक महापालिकेत अलिकडेच मोठे पक्षांतर पाहायला मिळाले. काँग्रेसमधील जवळपास 28 नगरसेवकांनी महापौरांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यामुळे मालेगाव  महापालिकेत काँग्रेस पक्षाचे अस्तित्वच समाप्त झाले. काँग्रेस पक्षाची नाशिक महापालिकेतील सत्ता तर गेली. परंतू, त्यासोबतच ताकदही शून्यावर आली. त्यामुळे पुण्यातही राष्ट्रवादी काँग्रेस असाच काहीसा प्रयत्न करणार का? याबाबत उत्सुकता आहे. टीव्ही नाईनने याबाबत वृत्त दिले आहे. (हेही वाचा, Malegaon Municipal Corporation: मालेगाव महापालिकेत काँग्रेसचा सुफडा साफ, 28 नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश)

दरम्यान, पुण्यात करीश्मा करण्यासाठी या वेळी मनसेही प्रयत्नशिल आहे. राज ठाकरे यांनीही या वेळी मनावर घेतल्याचे पाहायला मिळते आहे. त्यांनी बैठकांचा सपाटाच लावला आहे. त्याला राजकीय यश किती मिळणार याबाबत उत्सुकता आहे. दरम्यान, शिवसेनाही दमदार कामगिरी करण्याचा विचार करते आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने पुण्याची जबाबदारी आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर दिली आहे. त्यामुळे पुणे महापालिकेत आगामी काळात काय घडते याबाबत मोठी उत्सुकता आहे.