Pune Metro Good News: गणेशोत्सवात गर्दीच्या वेळेत दर पाच मिनिटांनी धावणार पुणे मेट्रो; महामेट्रोचा मोठा निर्णय

गणेशोत्सवादरम्यान होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन महामेट्रोने गर्दीच्या वेळेत दर पाच मिनिटांनी मेट्रो चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी मेट्रोच्या ताफ्यातील सर्व ३३ रेक्स सेवेत दाखल केले जातील.

Pune Metro (PC - Wikimedia Commons)

Pune Metro PMRDA: आगामी गणेशोत्सवादरम्यान प्रवाशांची होणारी मोठी गर्दी लक्षात घेऊन पुणे मेट्रोने गर्दीच्या (पीक) वेळेत गाड्यांच्या फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या कालावधीत मेट्रो दर पाच मिनिटांनी धावणार असून, यामुळे प्रवाशांचा स्थानकांवरील प्रतीक्षा वेळ कमी होणार आहे. सध्या गर्दीच्या वेळेत मेट्रो दर सहा मिनिटांनी धावत असून पाच मिनिटांच्या अंतराच्या चाचण्या यशस्वीरीत्या सुरू आहेत.

ताफ्यातील सर्व ३३ रेक्स प्रवाशांच्या सेवेत

प्रवाशांची वाढती संख्या आणि सणासुदीच्या दिवसांतील अतिरिक्त भार वाहण्यासाठी महामेट्रो आपल्या संपूर्ण ताफ्याचा वापर करणार आहे. सध्या नियमित सेवेत ३० रेक्स कार्यरत आहेत, मात्र उत्सवाच्या काळात तिन्ही डब्यांचे सर्व ३३ रेक्स मार्गावर उतरवले जातील.

या नियोजनानुसार वनाज ते रामवाडी मार्गावर १७ रेक्स, तर पिंपरी चिंचवड ते स्वारगेट मार्गावर १६ रेक्स धावतील. दोन्ही कॉरिडोअरवर मिळून पूर्ण क्षमतेने गाड्या चालवल्या जातील.

वाढत्या प्रवासी संख्येमुळे निर्णय

पुणे मेट्रोच्या दैनंदिन प्रवासी संख्येत सातत्याने वाढ होत आहे. महामेट्रोच्या आकडेवारीनुसार, सध्या दोन्ही मार्गांवर दररोज सुमारे २.८ लाख नागरिक प्रवास करत असून दररोज ५५४ फेऱ्या चालवल्या जात आहेत.

गणेशोत्सवात मध्यवर्ती पुण्यासह शहरातील विविध भागांत भाविकांची आणि पर्यटकांची रेलचेल प्रचंड वाढते. त्यामुळे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी विभागण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी फेऱ्यांमधील अंतर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी स्पष्ट केले.

नॉन-पीक तासांचे वेळापत्रक कायम

वारंवारतेत केलेली ही वाढ केवळ गर्दीच्या वेळेपुरती मर्यादित असेल. दुपारच्या आणि कमी गर्दीच्या (नॉन-पीक) वेळेत मेट्रो गाड्या नेहमीप्रमाणे दर १० मिनिटांनीच धावतील. सामान्य वेळापत्रकात मोठा बदल न करता सर्वाधिक मागणीच्या कालावधीत प्रवाशांना अतिरिक्त क्षमता उपलब्ध करून देणे हा यामागील मुख्य उद्देश आहे.

मध्यवर्ती स्थानकांवर विशेष सुरक्षा आणि व्यवस्था

गणेशोत्सवाच्या काळात पुण्यातील मध्यवर्ती भागाला जोडणाऱ्या स्थानकांवर प्रवाशांची वर्दळ अधिक असते. यासाठी महामेट्रोने मंडई स्थानकावर गर्दीचे नियोजन करण्यासाठी विशेष तयारी केली आहे. सणादरम्यान स्थानकांवर अतिरिक्त कर्मचारी, सुरक्षा रक्षक आणि मदत कक्ष तैनात करण्यात येणार आहेत, जेणेकरून प्रवाशांना सुरक्षित व सुलभ प्रवास करता येईल.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement