Pune Koyta Gang Terror: पुण्यात 'कोयता गॅंग'ची दहशत असताना बोहरी आळीतील एका दुकानात गुन्हे शाखेची कारवाई; 105 कोयते जप्त
पुण्यात काही ठिकाणी भाईगिरी दाखवण्यासाठी अल्पवयीन मुलं कोयते घेऊन फिरत असल्याचं समोर आलं आहे.
पुणे (Pune) शहरामध्ये कोयत्याचा (Koyta) वापर करून मागील काही दिवसांत दहशत पसरवण्याचे प्रकार समोर आले आहेत. अशामध्ये आता पोलिसांकडून कोयते विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. बोहरी आळी भागात एका दुकानावर गुन्हे शाखेच्या पथकाकडून छापा घालण्यात आला. त्यामध्ये दुकानात विक्रीसाठी ठेवलेले सुमारे 105 कोयते जप्त करण्यात आले आहेत. पोलिसांनी या प्रकरणी हुसेन राजगारा या दुकानदाराला देखील अटक केली आहे.
पुण्यात काही ठिकाणी भाईगिरी दाखवण्यासाठी अल्पवयीन मुलं कोयते घेऊन फिरत असल्याचं समोर आलं आहे. भर रस्त्यात गर्दीमध्येही काहींवर कोयत्याने वार करून दहशत निर्माण केली जात आहे. काही दुकानदारांना कोयत्याचा धाक दाखवून खंडणी मागितली जात आहे. त्यामुळे या अशा गुन्ह्यात सातत्याने कोयत्याचा वापर केला जात असल्याने त्यावर कारवाईची मागणी होत होती. समर्थ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 7-8 जणांकडून अशाच पद्धतीने दहशत माजवण्यात आली होती. त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात आली आहे. आता या गँगला कोयता पुरवणाऱ्या दुकानदारावर कारवाई करत कोयते जप्त करण्यात आली आहे.
महाराष्ट्र विधानसभेत विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी देखील कोयता गॅंगचा विषय उपस्थित करून त्याकडे लक्ष वेधले होते. सुप्रिया सुळेंनीही याबाबत प्रश्न विचारला होता. त्यानंतर आता पोलिसांकडून होणार्या कारवाईला वेग आला आहे. त्यांनी मोहिम हातात घेत थेट कोयते विक्री दुकानांवरच छापे टाकायला सुरूवात केली आहे.