Pune Hinjewadi IT Park: पुण्यात अजूनही पायाभूत सुविधांचा अभाव? हिंजवडीच्या 37 आयटी कंपन्यांनी घेतला काढता पाय, केले इतरत्र स्थलांतर
हे आयटी पार्क 150 हून अधिक छोट्या-मोठ्या कंपन्यांना सामावून घेत असूनही, या ठिकाणी पायाभूत सुविधांची कमतरता आहे.
Pune Hinjewadi IT Park: देशातील आयटी हब (IT Hub) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहरांमध्ये पुण्याचे (Pune) नाव घेतले जाते. आयटी क्षेत्राच्या विस्तारामुळे भारताच्या नकाशावर पुण्याला खास ओळख प्राप्त झाली. मात्र आता हिंजवडी इंडस्ट्रीज असोसिएशन (HIA) ने दावा केला आहे की, गेल्या दहा वर्षांत तब्बल 37 आयटी कंपन्या हिंजवडी राजीव गांधी इन्फोटेक पार्कमधून स्थलांतरीत झाल्या आहेत. शहरातील पायाभूत सुविधांची बिघडलेली परिस्थिती आणि परिसरातील वाहतूक कोंडीमुळे यातील काही कंपन्यांनी परिसरातून तर काहींनी पुण्यातूनच काढता पाय घेतला आहे. मात्र महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे (MIDC) कंपन्यांच्या या स्थलांतराची अचूक आकडेवारी नाही.
साधारण 25 वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या हिंजवडी आयटी पार्कला आता रस्ते, जास्त भाडे, पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन आणि वीज यासह अपुऱ्या पायाभूत सुविधांचा सामना करावा लागत आहे. हे आयटी पार्क 150 हून अधिक छोट्या-मोठ्या कंपन्यांना सामावून घेत असूनही, या ठिकाणी पायाभूत सुविधांची कमतरता आहे. रस्ते अरुंद आणि खराब स्थितीत असल्याने वारंवार वाहतूक कोंडी होते. यामुळे एचआयएच्या दाव्यानुसार, अनेक कंपन्या राज्याच्या इतर भागात किंवा राज्याबाहेरही स्थलांतरित होत आहेत.
हिंजवडी आयटी पार्कमध्ये ट्रॅफिक जॅममुळे अर्ध्या तासाच्या प्रवासाला दीड तास लागतो, परिणामी कर्मचाऱ्यांचा दररोज एक तास वाया जातो. याबाबत एचआयएचे सचिव लेफ्टनंट कर्नल (निवृत्त) योगेश जोशी म्हणाले की, ते गेल्या दशकापासून पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी विनंती करत आहेत. रस्त्यांची स्थिती खराब आहे, विशेषत: पावसाळ्यात या ठिकाणी अपघातांचा धोका वाढतो. परिसरात पदपथांचा अभाव असल्याने पादचाऱ्यांना अत्यंत सावधगिरीने चालावे लागते. सरकारी यंत्रणांकडे वारंवार पाठपुरावा करूनही कोणतीही कार्यवाही झालेली नसल्याचा दावा त्यांनी केला. (हेही वाचा: Pune Accident: पुण्यातील कर्वे रोडवर क्रेनने चिरडल्याने सायकलस्वाराचा मृत्यू; आरोपीला अटक, तपास सुरु)
पुण्यात वाहतूक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरात वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. पुण्यात मेट्रोचे काम सुरू असल्याने हे प्रमाण वाढले आहे. पुण्यातील हिंजवडी येथे मोठ्या संख्येने कर्मचारी येतात. मात्र, वाहतूक कोंडीमुळे अनेक कर्मचाऱ्यांना कंपनीत वेळेवर पोहोचता येत नाही. अनेक कंपन्यांनी घरून काम करणेही बंद केले आहे, त्यामुळे कंपन्यांचे मोठे नुकसान होत आहे. हिंजवडीमध्ये सध्या सुमारे 150 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील कंपन्या असून, तिथे 5 लाख लोक काम करतात. परिसरात दररोज 1 लाखाहून अधिक कार आणि इतर वाहने धावतात. हिंजवडीला जाण्यासाठी भुजबळ चौक आणि भूमकर चौक हा एकमेव मार्ग आहे. येथे मेट्रोचे कामही सुरू आहे. हा मेट्रो मार्ग सुरू झाल्यास वाहतुकीचा ताण कमी होईल, मात्र, त्यासाठी अजून बराच अवकाश आहे.