Pune Fire: कोंढवा परिसरात गॅरेजमध्ये लागलेल्या आगीत 10 गाड्या जळून खाक; जीवित हानी नाही

पुणे शहरातील कोंढवा (Kondhwa) परिसरात असलेल्या एका गॅरेजमध्ये लागलेल्या आगीत 10 गाड्या जळून खाक झाल्या आहेत.

Fire (Representational image) Photo Credits: Flickr)

पुणे शहरातील कोंढवा (Kondhwa) परिसरात असलेल्या एका गॅरेजमध्ये लागलेल्या आगीत 10 गाड्या जळून खाक झाल्या आहेत. दरम्यान आगीत नुकसान झालेल्या गाडीमध्ये प्रामुख्याने चार चाकी वाहनांचा समावेश आहे. यामध्ये कार अधिक प्रमाणात आहेत. सुदैवाने या प्रकारामध्ये कोणतीही जीवित हानी झालेली नाही. आगीचं वृत्त समजताच तात्काळ अग्निशमन दलाचे अधिकारी तेथे रवाना झाले त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलं आहे.

अग्निशमन दलाच्या अधिकार्‍याने आज (25 जून) दिवशी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा परिसरात लागलेल्या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दरम्यान अधिकार्‍याने ही आग बुधवार (24 जून) रात्री उशिरा लागल्याचं सांगण्यात आले आहे. गॅरेजमध्ये चार चाकी वाहनं आणि अन्य काही सामान ठेवण्यात आले होते. रात्री 11 वाजून 45 मिनिटांनी आग लागल्याची माहिती समोर आली. घटनास्थळी 10 अग्निशमन दलाच्या गाड्या तात्काळ पाठवण्यात आल्या. रात्री 12 वाजेपर्यंत या आगीवरपूर्ण नियंत्रण मिळवण्यात आलं

पुण्यात गॅरेजमध्ये लागलेल्या या आगीचं कारण स्पष्ट नसलं तरीही गॅरेज मध्ये ठेवण्यात आलेलं सामान आणि 10 चार चाकी गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

आज सकाळी मुंबईमध्येही नरिमन पॉंईट परिसरात एका बॅंकेमध्ये आगीचा भडका उडाला होता.