पुणे: महिलेसमोर हस्तमैथुन; रिक्षाचालकाविरुद्ध पिंपरी-चिंचवड येथे गुन्हा दाखल

फिर्यादी महिला या दुकानात पाव खरेदी करत होती तर, तिचा पती जवळच्याच दुकानात दूध आणण्यासाठी गेला होता. या वेळी रिक्षाचालकाने तिच्याकडे पाहून हस्तमैथुन करण्यास सुरवात केली.

Rickshaw | (Photo Credit: Archived, Edited And Representative images)

एका अज्ञात रिक्षा चालकाने (Rickshaw Driver) महिलेसमोर हस्तमैथुन (Masturbate) केल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे. प्राप्त माहितनुसार ही घटना पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) येथील पिंपळे सौदागर (Pimple Saudagar) येथे घडली. सांगवी पोलिसांनी फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञात रिक्षाचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. एम.एच-12 क्यू.आर-1471 क्रामांकाच्या रिक्षात असलेल्या रिक्षाचालकाने अशा प्रकारचे कृत्य केल्याचा फिर्यादीचा दावा आहे. पोलिसांनी या क्रमांकाची रिक्षा आणि रिक्षाचालकाचा कसून शोध सुरु केला आहे.

प्राप्त माहितीनुसार, फिर्यादी महिला आपल्या पतीसोबत सोसायटी फाटकाजवळ असलेल्या दुकानात पाव खरेदी करण्यासाठी गेली होती. फिर्यादी महिला या दुकानात पाव खरेदी करत होती तर, तिचा पती जवळच्याच दुकानात दूध आणण्यासाठी गेला होता. या वेळी रिक्षाचालकाने तिच्याकडे पाहून हस्तमैथुन करण्यास सुरवात केली. सुरवातीला पीडितेने त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र, तरीही त्याने हा प्रकार सुरुच ठेवला. अखेर पीडित महिलेने आपल्या पतीस बोलावण्याचा प्रयत्न केला. मात्र, रिक्षाचालकाने तोपर्यंत घटनास्थळावरुन पोबारा केला होता.

दरम्यान, पीडिता दुसऱ्या दिवशी आपल्या मैत्रिणीसोबत कॉफी शॉपवर गप्पा मारत थांबली होती. याही वेळी तोच रिक्षावाला पुन्हा त्याच रिक्षातून तिथे आला. त्याने पुन्हा पीडितेकडे पाहून अश्लील हावभाव आणि हस्तमैथुन करण्यास सुरुवात केली. त्यानंतर पीडितेने आणि तिच्या मैत्रिणींनी संबंधीत रिक्षाचा क्रमांक नोंदवून घेतला. त्यानंतर पोलिसांत फिर्याद दिली. (हेही वाचा, ठाणे : लोकलच्या लेडीज कोच मध्ये तरुणींसमोर अल्पवयीन मुलाने केले हस्तमैथुन, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल (Watch Video))

पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरुन सांगवी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, त्या विकृत रिक्षाचालकाचा कसून तपास सुरु केला आहे. दरम्यान, एम.एच-12 क्यू.आर-1471 क्रमांकाची रिक्षा कोणाला आढळल्यास सांगवी पोलीस ठाण्याशी संपर्क करावा, असे अवाहन सांगवी पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी केले आहे.