पुण्यातील 'येवले', 'साईबा' अमृततुल्य चहा दुकानावर FDA ची कारवाई; दंडात्मक कारवाई करुन विक्री तातडीने बंद करण्याचे आदेश

येवले अमृतुल्यवर दंडात्मक कारवाई करुन विक्री तातडीने बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Yevle Amrutulya (Photo Credits: Instagram)

पुण्यात सध्या चहाप्रेमींचा कट्टा बनलेला 'येवले' अमृततुल्य (Yewale Amruttulya) चहा यांच्यावर अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाने धडक कारवाई केली आहे. बुधवार पेठेतील (Budhvar Peth) प्रसिद्ध येवले अमृततुल्य चहा दुकान विना परवाना तसेच विना नाेंदणी सुरु असल्याच्या आरोपाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 अंतर्गत जनहित व जनआराेग्य याच्या दृष्टीकाेनातून काही तरतुदींचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली 'येवले' अमृततुल्य चहा यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. चहाप्रेमींनो ! तलफ आली तरीही चहा या '5' वेळी पिणं टाळा

पुण्यात चहाप्रेमींची गर्दी

पुण्यातील 'येवले' अमृततुल्य चहा त्यांच्या हटके चहाच्या थीममुळे  मागील काही दिवसांपासून खूप चर्च मध्ये होते. सोशलमीडियापासून ते अगदी पुण्यात आणि महाराष्ट्रभर पसरलेल्या त्यांच्या काही शाखांमध्ये चहाप्रेमी हमखास थांबून चहा पितात. मात्र येवले अमृतुल्यवर दंडात्मक कारवाई करुन विक्री तातडीने बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

येवले अमृततुल्य प्रमाणे साईबा अमृततुल्यच्या विविध शाखांवर कारवाई करण्यात आली आहे. साईबा अमृतुल्यच्या नानापेठ, धनकवडी, भारती विद्यापीठ शाखांवर एफडीएने कारवाई केली आहे.