पुणे जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघ: वडगांव शेरी, शिवाजी नगर, हडपसर, शिरूर जागांवरील उमेदवार यादी, लढत आणि राजकीय इतिहास घ्या जाणून

महाराष्ट्रात 288 मतारसंघासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडेल. 21 ऑक्टोबर या दिवशी प्रत्यक्ष मतदान तर, 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी पार पडणार आहे.

पुणे जिल्हा मतदार संघ (Photo credit: Archived, edited, representative images)

Maharashtra Assembly Elections 2019: विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील महत्वाच्या जिल्ह्यांपैकी एक म्हणजे पुणे (Pune). गेले 20 वर्षे कॉंग्रेस-राष्ट्रवादीचा (Congress-NCP) बालेकिल्ला म्हणून हा जिल्हा ओळखला जायचा. मात्र गेल्या 5 वर्षांमध्ये भाजपने (BJP) इथे खिंडार पाडले आहे. राष्ट्रवादीने बरीच वर्षे या जिल्ह्यात जम बसवूनही शरद पवार यांच्या गोटातून बाहेर पडून अनेक लोकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र आता विधानसभेसाठी राष्ट्रवादीने भाजप समोर फार मोठे आव्हान उभे केले आहे. पुण्यातील अनेक मतदारसंघात थेट भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये लढत पाहायला मिळत आहे. पुण्यात तब्बल 21 मतदार संघ आहेत. मागच्या विधानसभेमध्ये भाजपने इथे तब्बल 11 जागा जिंकल्या होत्या. लोकसभेच्या पराभवानंतर आता कॉंग्रेस-राष्ट्रवादीने पुन्हा आपली पकड घट्ट करण्यासाठी कंबर कसली आहे. चला पाहूया पुणे जिल्ह्यातील मतदारसंघ आणि लढती

वडगांव शेरी (Wadgaon Sheri) - वडगांव शेरी विधानसभा मतदारसंघ हा पुणे लोकसभा मतदारसंघात येते, जिथे शिवसेनेचे गिरीश बापट यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत 3 लाख 24 हजार 628 मतांच्या फरकाने विजय मिळविला होता. भारतीय जनता पक्षाचे जगदीश मुळीक येथून विद्यमान आमदार आहेत. यंदा भाजपकडून जगदीश मुळीक तर राष्ट्रवादीकडून सुनील टिंगरे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 2009 साली कॉंग्रेसचे सुरेश कलमाडी इथून विजयी ठरले होते. त्यानंतर 2014 साली चित्र पालटून बापू पठारे (कॉंग्रेस) आणि सुनील टिंगरे (शिवसेना) यांना धूळ चारून मुळीक आमदार झाले.

शिरूर (Shirur) – एकेकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा हा मतदारसंघ 2014 साली भाजपमय झाला. 2014 साली भाजपचे बाबुराव पाचर्णे 92579 मते मिळवून विजयी ठरले होते. त्यांना राष्ट्रवादीचे अशोक पवार यांनी कडवे आव्हान दिले होते. यंदाच्या विधानसभेसाठी पुन्हा एकदा भाजपने बाबुराव पाचर्णे यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्यासमोर राष्ट्रवादीने अशोक पवार यांना उभे केले आहे, तर मनसेकडून कैलास नरके उभे आहेत.

शिवाजीनगर (Shivaji Nagar) – महाराष्ट्रात 2009 साली मतदारसंघांची पुनर्रचना झाली, त्यानंतरही हा मतदारसंघ अस्तित्वात होता. मात्र त्यानंतर या मतदारसंघातील राजकारण वेळोवेळी बदलत आले आहे. शिवाजीनगर मतदारसंघात सर्व नगरसेवक भाजपचे आहेत. 2014 सालच्या विधानसभेत कॉंग्रेसच्या विनायक निम्हण यांचा पराभव करून भाजपचे विजय काळे विजयी झाले होते. यावेळी भाजपकडून सिद्धार्थ शिरोळे यांना तिकीट देण्यात आले आहे. त्यांना कॉंग्रेसच्या दत्तात्रेय भैराट तर मनसेकडून सुहास निम्हण यांचे आव्हान असणार आहे.

हडपसर (Hadapsar) - हडपसर विधानसभा मतदारसंघ हा महाराष्ट्रातील शिरूर लोकसभा मतदारसंघात येते, तेथून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे डॉ. अमोल रामसिंग कोल्हे यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत 58 हजार 483 मतांनी विजय मिळविला होता. भारतीय जनता पक्षाचे योगेश टिळेकर हे येथून विद्यमान आमदार आहेत. 2009 साली शिवसेनचे महादेव बाबर निवडून आले होते. यंदाच्या विधानसभेसाठीही भाजपकडून योगेश यांनाच उमेदवारी देण्यात आली आहे. तर राष्ट्रवादीकडून चेतन तुपे आणि मनसेकडून वसंत मोरे उभे आहेत. हडपसर येथील बहुजन संघानेही टिळक यांना पाठींबा दर्शवला आहे.

दरम्यान, या वेळी विधानसभा निवडणूक प्रक्रियेत महाराष्ट्रात 8 कोटी 94 लाख मतदार मतदान करतील. महाराष्ट्रात 288 मतारसंघासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडेल. 21 ऑक्टोबर या दिवशी प्रत्यक्ष मतदान तर, 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी पार पडणार आहे.