पुणे जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघ: भोसरी, दौंड, जुन्नर, पर्वती जागांवरील उमेदवार यादी, लढत आणि राजकीय इतिहास घ्या जाणून

महाराष्ट्रात 288 मतारसंघासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडेल. 21 ऑक्टोबर या दिवशी प्रत्यक्ष मतदान तर, 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी पार पडणार आहे.

पुणे जिल्हा मतदार संघ (Photo credit: Archived, edited, representative images)

Maharashtra Assembly Elections 2019: विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील महत्वाच्या जिल्ह्यांपैकी एक म्हणजे पुणे (Pune). आधी कॉंग्रेस-राष्ट्रवादीचा (Congress-NCP) बालेकिल्ला म्हणून हा जिल्हा ओळखला जायचा मात्र गेल्या 5 वर्षांमध्ये भाजपने (BJP) इथे खिंडार पाडले आहे. आता विधानसभेसाठी राष्ट्रवादीने भाजप समोर फार मोठे आव्हान उभे केले आहे. पुण्यातील अनेक मतदारसंघात थेट भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये लढत पाहायला मिळत आहे. यामध्ये दौंड, पर्वती, जुन्नर या मतदारसंघांचा समावेश होतो.  पुण्यात तब्बल 21 मतदार संघ आहेत. मागच्या विधानसभेमध्ये भाजपने इथे तब्बल 11 जागा जिंकल्या होत्या. लोकसभेच्या पराभवानंतर आता कॉंग्रेस-राष्ट्रवादीने पुन्हा आपली पकड घट्ट करण्यासाठी कंबर कसली आहे. चला पाहूया पुणे जिल्ह्यातील मतदारसंघ आणि लढती

भोसरी (Bhosari) - भोसरी मतदारसंघात महायुतीने भाजपकडून आमदार महेश लांडगे यांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादीने इथून आपला कोणताही उमेदवार दिला नाही, त्यामुळे नगरसेवक दत्ता साने आणि माजी आमदार विलास लांडे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला होता. दत्ता साने यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने इथे भाजप विरुद्ध अपक्ष अशी लढाई होणार आहे. आता राष्ट्रवादीनेही आमदार विलास लांडे यांना आपला पाठींबा दर्शवला आहे.

2009 साली भोसरी हा मतदारसंघ अस्तित्वात आला. त्यावेळी विलास लांडे हे इथले पहिले आमदार ठरले, त्यानंतर 2014 साली अपक्ष म्हणून उभे राहिलेल्या महेश लांडगे यांना जनतेने निवडले. दत्ता साने यांनी इथे पार पडलेल्या दोन्ही निवडणुकीत महत्वाची जबाबदारी बजावली आहे. दोन्ही वेळेला राष्ट्रवादीला विरोध करत अपक्ष उमेदवारालाच त्यांनी निवडणून आणले आहे. त्यामुळे यावर्षी ते काय कमाल करतील हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

जुन्नर (Junnar) – 2014 साली या मतदारसंघात मनसे आणि शिवसेना अशी लढत रंगली होती. मनसेचे शरददादा भिमाजी सोनावणे यांनी शिवसेनेच्या श्रीमती आशा बुचके यांचा पराभव केला होता. यावर्षी अर्ज मागे घेण्याच्या दिवसानंतर एकूण 11 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिले आहेत. जुन्नर विधानसभा मतदारसंघासाठी महाआघाडीकडून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार अतुल बेनके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात शिवसेनेचे शरद सोनावणे उभे आहेत.

पर्वती (Parvati) – पुणे शहरातील पर्वती मतदारसंघातून एकूण पंधरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीने इथून अश्विनी कदम यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर भाजपकडून माधुरी मसाळ निवडणूक लढवत आहेत.

दौंड (Daund) - बारामती लोकसभा मतदारसंघातील, राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून दौंड मतदारसंघाकडे पाहिले जाते. 2009 साली राष्ट्रवादीकडून राहूल कूल निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिले होते. त्यावेळी अपक्ष उमेदवार रमेश थोरात यांनी त्यांचा पराभव केला. त्यानंतर शरद पवार यांनी थोरातांना राष्ट्रवादीमध्ये घेतले. 2014 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने रमेश थोरात यांना उमेदवारी दिली. यामुळे राहूल कूल यांनी राष्ट्रीय समाज पक्षात प्रवेश केला. विशेष म्हणजे त्यावेळी राहूल कूल यांनी रमेश थोरात यांचा पराभव केला.

यावेळी दौंड मतदारसंघातून 13 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. पुन्हा एकदा राहुल कुल भाजपकडून तर रमेश थोरात राष्ट्रवादीकडून लढणार आहेत. जनता दलाचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब देशमुख यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेत कुल यांना पाठिंबा दिला आहे.

दरम्यान, या वेळी विधानसभा निवडणूक प्रक्रियेत महाराष्ट्रात 8 कोटी 94 लाख मतदार मतदान करतील. महाराष्ट्रात 288 मतारसंघासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडेल. 21 ऑक्टोबर या दिवशी प्रत्यक्ष मतदान तर, 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी पार पडणार आहे.