प्रवाशांना सेवा पुरवण्यात पुणे विमानतळ अव्वल; जगात पटकावला तिसरा क्रमांक

एअरपोर्ट कौन्सिल ऑफ इंटरनॅशनल (एसीआय) ची एक परिषद कॅनडा येथे पार पडली. या परिषदेत ५० लाख ते दीड कोटी प्रवासी संख्या असलेल्या विमानतळांच्या गटात पुण्याला हा बहुमान मिळाला.

संग्रहीत आणि प्रतिकात्मक प्रतिमा

प्रवाशांना सेवा पूरवण्यात जगात अव्वल असलेली विमानतळं कोणती? हा प्रश्न तुम्ही स्वत:लाच विचाराल तर, नक्कीच तुम्ही विदेशातील विमानतळांचा विचार कराल. पण, भारतातील विमानतळही जगभरातील विमानतळांना तोडीस तोड आहेत. होय, हे पुण्याने दाखवून दिले आहे. पुणे विमानतळाला आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरविण्यात आले आहे. प्रवासीसेवेत सर्वोत्तम विमानतळांच्या यादीत पुणे विमानतळाने तिसरा क्रमांक पटकावला आहे. एअरपोर्ट कौन्सिल ऑफ इंटरनॅशनल (एसीआय) ची एक परिषद कॅनडा येथे पार पडली. या परिषदेत ५० लाख ते दीड कोटी प्रवासी संख्या असलेल्या विमानतळांच्या गटात पुण्याला हा बहुमान मिळाला.

एअरपोर्ट सर्व्हिस क्वॉलिटी (एएसक्यू) अॅवॉर्ड्स २०१८ कोट्यवधी प्रवाशांनी आपली मते नोंदवली. या मतांची नोंद घेत 'एसीआय'ने आपले रेटींग जाहीर केले. 'एसीआय ही जगभरातील' १७६ देशांतील सुमारे १९५३ विमानतळं सभासद असलेली व्यापारी संस्था आहे. ही संस्था विश्रांतीगृह, स्टोअर्स, रेस्टॉरंट, टर्मिनलपासून विमानतळाला जाण्याचा मार्ग, सुरक्षा विषयक तपासणी, प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सुविधा याबाबत पाहणी करते. या सुविंधांबाबत जवळपास ३४ कॅटेगरी आहेत. सर्व्हेक्षण करताना या कॅटेगरीनुसारच केले जाते.

यंदाच्या वर्षीही 'एसीआयने' सर्व्हे केला. या सर्व्हेसाठी 'एशिया-पॅसिफिक' गटातून भारतातील पुणे, लखनौ, चेन्नई, कोलकाता , अहमदाबाद आणि इंदूर या सहा विमानतळांचा समावेश झाला. त्यापैकी पुण्याने तिसऱ्या क्रमांकावर बाजी मारलीआहे. अर्थात, बाजी मारली म्हणण्यापेक्षा पुण्याने आपले स्थान कायम राखले आहे. कारण, गतवर्षी (२०१७) झालेल्या सर्व्हेक्षणातही कोची, कोलकाता आणि पुणे विमानतळ संयुक्तपणे तिसऱ्या स्थानावर होते. यंदा मात्र, केवळ पुण्यानेच आपले स्थान कायम राखले आहे.