Pulwama Terror Attack: हल्ल्याच्या निषेधार्त नालासोपारा येथील रेल रोखो मागे, वाहतूक सुरळीत होण्यास सुरुवात
यामुळे नालासोपारा ते विरार या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
पुलवामा येथे भारतीय लष्करावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्त नागरिकांकडून भारत बंदची हाक देण्यात आली आहे. अनेक ठिकाणी याला प्रतिसादही मिळत आहे. 44 जवान या हल्ल्यात शहीद झाले आहेत, हे पाहून देशात संतापाची लाट पसरली असून, या हल्ल्याच्या निषेधार्थ मुंबईजवळील नालासोपारा येथे नागरिकांनी रेल रोखो केला होता. यामुळे नालासोपारा ते विरार या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. मात्र आता हा 'रेल रोखो' मागे घेण्यात आला आहे. सकाळी आठ वाजल्यापासूनच नागरिक रेल्वे रुळावर जमा व्हायला सुरुवात झाली. हळू हळू ही संख्या वाढत गेली आणि रेल्वेची वाहतूक पूर्णपणे थांबली. नालासोपारा भागात आज बंददेखील पाळण्यात येणार आहे.
‘पाकिस्तान मुर्दाबाद’, ‘पाकिस्तान हाय हाय’, अशा घोषणा देत नागरिकांनी आज सकाळपासूनच रेल रोखोला सुरुवात केली. नागरिकांच्या या आंदोलनामुळे अप आणि डाऊन मार्गांवरील रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती, मात्र आत ती सुरळीत होत आहे. कामाच्या गडबडीत हा निषेध पाळण्यात आल्याने अनेक प्रवासी रेल्वे ट्रॅकवरून चालत जाताना दिसून आले होते.
दरम्यान, आज शहीद जवानांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावाकडे रवाना झाले आहेत. मानवंदना देऊन आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी देशातील सर्व प्रमुख राजकीय पक्षांना बैठकीचे आमंत्रण दिले आहे. केंद्र सरकारने या सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले आहे. सकाळी 11 वाजता संसदेच्या ग्रंथालयात ही बैठक सुरु झाली आहे.