Protest Against PM Narendra Modi: पीएम नरेंद्र मोदींच्या पुणे दौऱ्यावेळी महाविकास आघाडीचे आंदोलन; सर्व प्रमुख चौकांत काळ्या कपड्यात करणार निषेध

याआधी 7 फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला उत्तर दिले.

PM Narendra Modi (Photo Credits: Twitter)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) 6 मार्च रोजी पुणे (Pune) दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे कार्यकर्ते पंतप्रधानांच्या विरोधात आंदोलन करतील, असे स्थानिक नेत्यांनी शुक्रवारी सांगितले. यावेळी कोरोना व्हायरसच्या प्रसारासाठी महाराष्ट्र सरकारला जबाबदार धरत पंतप्रधानांनी संसदेत केलेल्या भाषणाचा विधानाचा निषेध केला जाईल, असे नेत्यांनी सांगितले. शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत जगताप आणि काँग्रेसचे रमेश बागवे यांनी ही घोषणा केली.

राष्ट्रवादीचे नेते म्हणाले की, ‘उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत मते मिळवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत महाराष्ट्राने कोविड-19 चा प्रसार इतर राज्यांमध्ये केला, अशी टिप्पणी केली होती. हा राज्याचा अपमान आहे. पुढच्या महिन्यात मोदी पुण्यात येण्याची शक्यता आहे. 6 मार्च रोजी तिन्ही पक्ष 'गो बॅक मोदी' आंदोलन करतील,’ मेट्रो रेल्वे सेवेच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान 6 मार्च रोजी पुण्यात येणार आहेत, परंतु त्यांच्या कार्यक्रमाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. (हेही वाचा: कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्यानंतरही महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होणार नाही का? चंद्रकांत पाटीलांचा सवाल)

शहरातील सर्व प्रमुख चौकांवर हे आंदोलन करण्यात येणार असून आंदोलक काळे कपडे परिधान करतील, असे जगताप यांनी सांगितले. याआधी 7 फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला उत्तर दिले. त्यावेळी त्यांनी महाराष्ट्राचा उल्लेख कोरोनाचा संसर्ग पसरवणारे राज्य म्हणून केला होता. ते म्हणाले, काँग्रेसच्या लोकांनी मुंबईतील रेल्वे स्टेशनवर उभे राहून जनतेला इतरत्र जाण्यास उद्युक्त केले. दिल्ली आणि महाराष्ट्र सरकारमुळे कोरोनाने यूपीला आपल्या कवेत घेतले.

दरम्यान, नुकतेच राज्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक ईडीने कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केली. या गोष्टीच्या विरोधात तीन एमव्हीए पक्षांनी शुक्रवारी पुण्यात संयुक्त निदर्शने केली होती.