पंतप्रधान मोदी यांच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी पोलीस मग्न; महिलेच्या अंत्यसंस्कारास 4 तासांचा विलंब
या महिलेचे अंत्यसंस्कार तब्बल ४ तास विलंबाने झाले कारण, तिच्या मृतदेहाचा पंचानामा करण्यासाठी एकही पोलीस उपलब्ध होऊ शकला नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi)यांचा पुणे (Pune)दौरा चोख पार पडावा यासाठी सुरक्षाव्यवस्थेत गर्क असलेल्या पोलीस दलाला सर्वसामान्य जनतेचा विसर पडल्याचे रविवारी पाहायला मिळाले. पंतप्रधानांच्या कार्यक्रमाची सुरक्षा पाहण्यात पोलीस यंत्रणा इतकी व्यग्र होती की, एका मृत महिलेच्या कुटुंबीयांना तिचे अंत्यसंस्कार करण्यासाठी तब्बल चार तास वाट पाहावी लागली. या महिलेचे अंत्यसंस्कार तब्बल ४ तास विलंबाने झाले कारण, तिच्या मृतदेहाचा पंचानामा करण्यासाठी एकही पोलीस उपलब्ध होऊ शकला नाही. त्यामुळे पिंपरी-चिंचवड येथील पीसीएमसी (PCMC) संचलीत वायसीएम (YCM) रुग्णालयात या महिलेच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करता येऊ शकत नव्हते. पंतप्रधान पुणे दौऱ्यावर मंगळवारी (18 डिसेंबर) येणार होते. मात्र, त्यांच्या सुरक्षेसाठी पोलीस दल रविवारीपासूनच कार्यरत झाले होते.
इंग्रजी वृत्तपत्र इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, बी चौधरी (वय 47 वर्षे) यांचा गुजरात येथील एका रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. चौधरी यांच्या नातेवाईकांनी त्यांचा (बी चौधरी) मृतदेह कासारवडवली येथे रविवारी सकाळी 8च्या सुमारास आणला. मृत शरीराचे शवविच्छेदन करण्यासाठी त्यांचे शरीर पिंपरी-चिंचवड येथील पीसीएमसी संचलीत वायसीएम रुग्णालयात नेण्यात आले. तेथून त्यांचे पार्थीव अंतीम संस्कारासाठी स्मशानभूमीत नेण्यात येणार होते. मात्र, त्यासाठी Crematorium Pass (शस्त्रक्रिया पास) ची आवश्यकता होती. प्राप्त माहितीनुसार हा पास मिळण्यासाठी पोलीसांनी पंचनामा करावा लागतो.
दरम्यान, सकाळी 8 वाजलेपासून दुपारी 12 वाजेपर्यंत एकही पोलीस पंचनामा करण्यासाठी उपलब्ध होऊ शकला नाही. मृताचे नातेवाईक मात्र चिंतीत चेहरा घेऊन रुग्णालय परिसरात हताशपणे बसून होते. रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनीही हात झटकले. जोपर्यंत पोलीस येऊन पंचनामा करत नाहीत. तोपर्यंत आम्ही काही करु शकत नाही. तसेच, मृतदेहही नातेवाईकांच्या ताब्यात देऊ शकत नाही, असे रुग्णालय अधिकाऱ्यांचे म्हणणे. (हेही वाचा, कल्याण: मोदींच्या सभेसाठी स्मशानभूमी बंद; अंत्ययात्रांना बंदी?)
पोलीस आणि रुग्णालय प्रशासनात टोलवाटोलवी
दरम्यान, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश पाटील यांनी सांगितले की, माहिती कळताच आम्ही पोलीस कर्मचाऱ्यांना पंचनामा करण्यासाठी तातडीने वायसीएम रुग्णालयात पाठवले. मात्र, तेथील कर्मचारी पंतप्रधानांच्या कार्यक्रम दौऱ्यासाठी कर्तव्यावर होते. ज्या पोलीस अधिकाऱ्याने पंचनामा केला त्याने म्हटले की, मला पंचनामा करण्यासाठी रुग्णालयात जाण्यासाठी सांगण्यात आले होते. तेथे रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले की, शवविच्छेदन करण्यासाठी किमान 3 ते 4 तास लागतील. वायसीएम रुग्णालयाचे प्रमुख पद्माकर पंडित यांनी सांगितले की, मृत व्यक्तीचे वय जर 50 वर्षांपेक्षा कमी असेल तर, त्यासाठी असलेल्या नियम व अटींनुसारच आम्हाला शवविच्छेदन करावे लागते. दरम्यान, या प्रकारानंतर शरीराचे शवविच्छेदन झाले व संबंधीत महिलेचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.