Maratha Reservation: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विषयांची समज कमी, त्यांना मराठा आरक्षण विषयच कळला नाही- काँग्रेस
चार पत्रं दिली. परंतू, पंतप्रधान मोदी यांनी यांनी एकदाही वेळ दिली नाही.
संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje) यांच्या वक्तव्यावर भाजप (BJP) प्रदेशाक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवरुन काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी जोरदार हल्ला चढवला आहे. काँग्रेस प्रवक्ते यांनी म्हटले आहे की, मनकवड्या चंद्रकांत पाटील यांनी तीन गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. यात पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांना विषयाची समज नाही, त्यांना मराठा आरक्षण (Maratha Reservation) हा विषय कळला नाही आणि छत्रपती या उपाधीची केवळ निवडणुकीत वापरण्याइतपतच मोदींच्या लेखी किंमत आहे, असा हल्लाबोल सावंत यांनी केला आहे.
काय म्हटले सचिन सावंत यांनी?
मनकवड्या चंद्रकांत पाटील यांनी तीन गोष्टी स्पष्ट केल्या आहेत
१ मोदींची विषयांची समज फार कमी आहे.
२. मोदींना मराठा आरक्षण हा विषय समजलाच नाही.
३. छत्रपती संभाजीराजे यांच्या नावातील छत्रपती या उपाधीची केवळ निवडणुकीत वापरण्याइतपतच मोदींच्या लेखी किंमत आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन नाराजी व्यक्त करताना संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले होते की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मराठा आरक्षणाबाबत आतापर्यंत चार वेळा वेळ मागीतली. चार पत्रं दिली. परंतू, पंतप्रधान मोदी यांनी यांनी एकदाही वेळ दिली नाही. (हेही वाचा, Maratha Reservation: मराठा आरक्षण प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेळ दिली नाही; खासदार संभाजीराजे छत्रपती यांचा नाराजीचा सूर, समाजाला शांततेचे अवाहन)
संभाजीराजे छत्रपती यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना चंद्रकांत पाटील यांनी म्हटले की, मराठा आरक्षणविषयी भारतीय जनता पक्ष सर्वोतोपरी प्रयत्न करतणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाटते की, मराठा आरक्षण हा विषय राज्याचा आहे. त्यामुळेच पंतप्रधान मोदी यांची आणि संभाजीराजे छत्रपती यांच्यात थेट भेट होऊ शकली नाही. चंद्रकात पाटील हे पुणे येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. या वेळी त्यांना संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केलेल्या नाराजीवरुन प्रश्न विचारण्यात आला होता.
दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे हे येत्या 5 जून पासून मोर्चा काढणार आहेत. या मोर्चाबाबत प्रतिक्रिया देताना चंद्रकांत पाटील म्हणाले की या मोर्चात आम्ही कोणत्याही पक्षाचा झेंडा अथवा बॅच घेऊन सहभागी होणार नाही. परंतू, एक नागरिक म्हणून आम्ही या मोर्चात सहभागी होऊ.