Prices of Leafy Vegetables Increased: पालेभाज्यांचे भाव कडाडले; बाजारपेठेत भाव खात आहे कोथिंबिर, एका जुडीसाठी मोजावे लागत आहेत 70 रुपये

पालेभाज्यांचा पुरवठा कमी होण्यामागचे मुख्य कारण म्हणजे, त्यांचे शेल्फ लाइफ इतरांच्या तुलनेत कमी आहे.

कोथिंबीर (Photo Credits-Facebook)

Prices of Leafy Vegetables Increased: महाराष्ट्रातील बहुतांश भागात पावसामुळे बहुतांश हिरव्या भाज्यांच्या पुरवठ्यावर गंभीर परिणाम झाला आहे. त्यामुळे सर्वचं पालेभाज्या (Leafy Vegetables) महागल्या आहेत. व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, किमान आणखी पंधरा दिवस तरी पालेभाज्यांचे दर वाढलेले राहतील. याशिवाय कोथिंबिरीच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. कोथिंबिरीच्या एका जुडीसाठी 70 रुपये मोजावे लागत आहेत.

राज्यभरात मुसळधार पावसामुळे भाजीपाल्याचा पुरवठा बऱ्याच दिवसांपासून कमी आहे. पालेभाज्यांचा पुरवठा कमी होण्यामागचे मुख्य कारण म्हणजे, त्यांचे शेल्फ लाइफ इतरांच्या तुलनेत कमी आहे. विशेषतः कोथिंबीर आणि मेथी लवकर खराब होते. त्यामुळे यांचे दर सध्या कडाडले आहेत. (हेही वाचा - Mumbai Rains: मुंबई मध्ये शनिवारच्या सकाळी आज जोरदार पावसाने दिवसाची सुरूवात; वाहतूक सेवा सुरळीत)

पालेभाज्यांच्या दरवाढीबद्दल बोलताना एका व्यापाऱ्याने सांगितले की, “निम्म्या पालेभाज्या वाहतुकीदरम्यान खराब होतात आणि त्यामुळे भाव वाढतात. दुसरे म्हणजे, अशा भाज्यांचे शेल्फ लाइफ खूपच कमी आहे." गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे भाजीपाल्याची आवक सुमारे 30 टक्क्यांनी घटल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (एपीएमसी) प्रशासकीय कार्यालयाने सांगितले आहे.

साधारणपणे, या हंगामात वाशीतील मुंबई एपीएमसीमध्ये दररोज भाजीपाला भरलेली सुमारे 500 ते 550 वाहने येतात. मात्र, गेल्या 10 दिवसांत 350 ते 410 वाहनांचा पुरवठा कमी झाला असून त्यापैकी बहुतांश वाहने ही लहान पिकअप व्हॅन आहेत.