मनसे च्या महाअधिवेशनाला वीज पुरवठा बंद? 'सरकारचा खालच्या पातळीवरील प्रयत्न' म्हणत संदीप देशपांडे यांनी केली टीका
मनसेचे हे महाअधिवेशन उद्या (जानेवारी २३) आयोजित करण्यात आले असून त्यात आता मोठा अडथळा निर्माण केला जात असल्याचा आरोप मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे.
राज ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष लवकरच आपली विचारसरणी बदलत हिंदुत्वाच्या मुद्दा हाती घेणार असल्याच्या चर्चा मागील काही दिवसांपासून पाहायला मिळत आहेत. तसेच याबाबतचा निर्णय मनसेने आयोजित केलेल्या महाअधिवेशनात घेण्यात येणार असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान मनसेचे हे महाअधिवेशन उद्या (जानेवारी २३) आयोजित करण्यात आले असून त्यात आता मोठा अडथळा निर्माण केला जात असल्याचा आरोप मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे.
मनसेने आयोजित केलेल्या महाअधिवेशनाच्या दिवशीच महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाकडून (एमएसईबी) भारनियमन केलं जाणार आहे.
मनसेचे महाअधिवेशन 23 जानेवारी रोजी सकाळी 10 ते संध्याकाळी 6 पर्यंत आयोजित करण्यात आले आहे. परंतु, वीज पुरवठ्यासंदर्भातील काहीतरी महत्त्वाचे काम असल्याने सकाळी ९.३० ते सायंकाळी सहा दरम्यान विजपुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याचे मेसेज त्या भागातील काही नागरिकांना आले आहेत.
याबाबदल आवाज उठवत संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे की, "वीज पुरवठा बंद करण्याचा सरकारचा खालच्या पातळीवरील प्रयत्न." त्यांनी मेसेजचा एका फोटो ट्विट करत असे लिहिले आहे.
एका वृत्तवाहिनीशी या संदर्भात बोलताना संदीप देशपांडे यांनी सरकारवर आरोप करत म्हटले की, "सरकारला असं काही करुन साध्य होणार नाही. हे खालच्या पातळीवर जाऊन केलेलं राजकारण आहे. ग्रामीण भागामध्ये असे मेसेज अनेकांना गेले आहेत. त्यामुळेच अशा गोष्टी केल्याने काहीच मिळणार नाहीय. त्याचसोबत एमएसईबीला देखील यासंबंधी योग्य पद्धतीने जाब विचारला जाणार आहे."
'उद्धवा अजब रे तुझे सरकार' मनसे नेते संदीप देशपांडे यांच्याकडून शिवसेनेला टोला
दरम्यान, मनसेच्या उद्याच्या महाअधिवेशनाचे अनेक पोस्टर्स मुंबई व ठाण्यात लावण्यात आले आहेत. तसेच या महाअधिवेशनादरम्यान मनसेचा झेंडा बदलणार असल्याची देखील चर्चा आहे.