Pothole-Free Roads: लवकरच मुंबईकरांना मिळणार खड्डेमुक्त रस्ते; शहरातील मार्गांच्या दुरुस्तीसाठी सरकारकडून साडेपाच हजार कोटींचा निधी

त्यांच्या कल्पकतेमुळे राष्ट्र उभे राहते. अभियंत्यांवर हल्ले होणार नाहीत यासाठी राज्य सरकार भक्कमपणे त्यांच्या पाठीशी उभे राहील, असे त्यांनी सांगितले.

Eknath Shinde | (Photo Credit: Archived, edited, representative images)

मुंबईच्या रस्त्यांवरील खड्ड्यांवर उपाययोजना (Pothole-Free Roads) करण्यासाठी 600 किलोमीटर लांबीचे रस्ते तातडीने दुरुस्त केले जात आहेत. त्यासाठी 5 हजार 500 कोटींचा निधी दिला आहे. रस्ते कामांच्या गुणवत्तेत तडजोड करू नका, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. रवींद्र नाट्य मंदिर येथे राष्ट्रीय अभियंता दिनानिमित्त मुंबई महापालिकेच्या अभियंत्यांनी आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मुंबई महानगरपालिका आपली आहे या समर्पित भावनेने काम करा.

मुंबई शहराला जागतिक स्तरावर मोठे महत्त्व आहे. विविध क्षेत्रांमध्ये देशाला उभारण्याचे काम अभियंत्यांनी केले आहे. असे सांगून मुख्यमंत्र्यांनी अभियंत्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले,  ‘इंजिनिअर्स इज द बॅकबोन ऑफ नेशन’ असे म्हटले जाते.  त्यांच्या कल्पकतेमुळे राष्ट्र उभे राहते. अभियंत्यांवर हल्ले होणार नाहीत यासाठी राज्य सरकार भक्कमपणे त्यांच्या पाठीशी उभे राहील, असे त्यांनी सांगितले.

आपल्या सर्वांच्या प्रयत्नांतून कोविडकाळात मुंबईचे आणि मुंबईकरांचे रक्षण केले. आपण स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करतोय. स्वातंत्र्यानंतर खऱ्या अर्थाने अभियंत्यांनी कृषी, जलसिंचन, औद्योगिक क्षेत्रातला विकास करून देश उभा केला, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. मुंबईत कोस्टल रोड, 337 किमी ची मेट्रो असे कितीतरी प्रकल्प उभे अभियंत्यामुळे उभे राहत आहेत. मिसिंग लिंक या जगातील सर्वात रुंद बोगद्याचे काम सुरू करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. (हेही वाचा: Mumbai: मुंबईत पुढील वर्षी पाणीकपात होणार नाही; मुसळधार पावसामुळे सातही तलाव जवळपास भरले)

गतिमान, बलशाली भारताच्या निर्माणात अभियंत्यांनी आपले सातत्यपूर्ण योगदान देत रहावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. ठाणे, नवी मुंबईच्या धर्तीवर सुशोभीकरण आणि सांडपाणी प्रक्रियेचे काम करण्यात यावे असे सांगून रस्ते कामाच्या गुणवत्तेत तडजोड करू नका, पैसा वाया जाऊ देऊ नका. राज्याला खूप पुढे न्यायचं आहे, लोकहिताचे प्रकल्प मुंबईत आणूया, मुंबईला वैभवशाली बनवूया असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी महानगरपालिका अभियंत्यांचे विविध प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी आपले प्रयत्न सुरु असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.मुख्यमंत्री तसेच उपस्थित मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला. खासदार राहुल शेवाळे यांनी मनोगत व्यक्त केले.