बोगस, मुजोर रिक्षा चालकांवर कारवाई; रिक्षा प्रवासाच्या तक्रारीसाठी टोल फ्री नंबर जारी
यामध्ये गेल्या काही दिवसांत पाच हजार रिक्षा चालकांवर कारवाई केली असून, 2600 रिक्षांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत.
मुंबई शहर आणि उपनगर परिसरात सध्या बोगस रिक्षा चालकांचा सूळसुळाट आहे. अवघ्या 200-300 रुपये प्रति दिवसांवर कोणतीही चौकशी न करता, कोणालाही रिक्षा भाड्याने दिल्या जात आहेत. तसेच एकाच परवान्यावर (License) अनेक चालक आपल्या रिक्षा चालवताना आढळले आहेत. अशा रिक्षा चालकांविरुद्ध पोलिसांनी कारवाई सुरु केली आहे. यामध्ये गेल्या काही दिवसांत पाच हजार रिक्षा चालकांवर कारवाई केली असून, 2600 रिक्षांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत.
सध्या शहरात मुजोर रिक्षा चालकांचेही प्रमाण फार वाढले आहे. भाडे नाकारणे, मुद्दाम जास्त भाडे सांगणे यामुळे प्रवाशांची गैरसोय आणि लुट होत आहे. अशा 743 रिक्षा चालकांवरही कारवाईचा चाबूक चालवला आहे. बरेच ठिकाणी मीटर ऐवजी रिक्षा चालक ज्यादा प्रवासी घेऊन ‘शेअर फेऱ्या’ करतात, प्रकरणात 339 जणांवर तसेच लायसन्स नसल्याने 3125 चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाई मोहिमेत आरटीओ 171 रिक्षा ताब्यात घेतल्या आहेत. (हेही वाचा: मुलांना खेळण्यासाठी केरळातील 'या' व्यक्तीने तयार केली मिनी ऑटो रिक्षा (Video))
सध्या प्रवाशांना दहिसर, कुर्ला-बीकेसी, बांद्रा स्थानक परिसर अशा ठिकाणी गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. प्रवाशांना कोणत्याही प्रकारचा त्रास झाला तर त्यांनी टोल फ्री क्रमांक1800220110 वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. आरटीओकडून जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर या तक्रारींचे निवारण केले जाईल.