PM Narendra Modi Pune Visit: 'अपूर्ण मेट्रोचे उद्घाटन करण्यापेक्षा युक्रेनमध्ये अडकलेल्या मुलांचा विचार करावा'; शरद पवार यांचा पंतप्रधानांवर निशाणा
एवढेच नाही तर रिव्हरफ्रंट विकास प्रकल्पाची पायाभरणी आणि इलेक्ट्रिक बसेसचे लोकार्पणही ते करणार आहेत.
रविवारपासून पुणेकरांचा प्रवास सुकर होणार आहे. उद्या (6 मार्च 2022) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) पुणे मेट्रो (Pune Metro) प्रकल्पाचे उद्घाटन करतील. पीएम मोदी सुमारे 12 किमी मेट्रो रेल्वेचे लोकार्पण करणार आहेत. गरवारे मेट्रो स्टेशनवरील प्रदर्शनाचे उद्घाटन आणि पाहणीही ते करणार आहेत. तेथून ते आनंदनगर मेट्रो स्थानकाकडे प्रयाण करतील. पुण्यात एकूण 32.2 किमी लांबीची मेट्रो स्टेशन लाईन बांधण्याची योजना आहे. पंतप्रधान मोदींच्या पुणे दौऱ्याच्या एक दिवस आधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पंतप्रधानांवर निशाणा साधला आहे.
शरद पवार म्हणाले, ‘मेट्रोचे काम अद्याप अपूर्ण आहे, मात्र पंतप्रधान मोदी त्याचे उद्घाटन करणार आहेत. त्याऐवजी पंतप्रधानांनी युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांची सुटका करण्याबाबत अधिक विचार करावा.’ शरद पवार शनिवारी एका कार्यक्रमात पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, ‘रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे अनेक विद्यार्थ्यांना त्रास होत आहे. मी तिथे अडकलेल्या एका भारतीय विद्यार्थ्याशी बोललो. त्याने मला सांगितले की भारतीय दूतावासाने त्याला युक्रेनची सीमा ओलांडून जाण्यास सांगितले होते, परंतु विद्यार्थी जिथे राहत आहेत त्यांच्यापासून सीमा फार दूर आहे.’
अलीकडेच, पवार यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांच्याशी बोलून त्यांना युक्रेन-पोलंड सीमेवर अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना लवकरात लवकर परत आणण्याची विनंती केली. या प्रकरणाचा पंतप्रधान मोदींनी गांभीर्याने विचार करावा, असे शरद पवार म्हणाले. शरद पवार पुढे म्हणाले की, ‘महिनाभरापूर्वी मी मेट्रो मार्गाला भेट दिली. त्याचे उद्घाटन पंतप्रधान मोदी करणार आहेत. ते ज्या मार्गाचे उद्घाटन करणार आहेत, त्या मार्गाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. मात्र, ते पुण्यात येण्यास माझी हरकत नाही.’ (हेही वाचा: PM Pune Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुणे दौऱ्यामुळे होणार वाहतुक कोंडी, 'हे' रस्ते राहणार बंद)
मेट्रो रेल्वेच्या उद्घाटनासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करणार आहेत. एवढेच नाही तर रिव्हरफ्रंट विकास प्रकल्पाची पायाभरणी आणि इलेक्ट्रिक बसेसचे लोकार्पणही ते करणार आहेत.