PM Narendra Modi Mumbai Visit: 'स्वातंत्र्यानंतर प्रथमच भारत मोठी स्वप्ने पाहण्याची आणि ती पूर्ण करण्याचे धाडस करत आहे'- मुंबईमध्ये पीएम नरेंद्र मोदी

याच कार्यक्रमात पंतप्रधानांनी सुमारे 17 हजार 200 कोटी रुपये खर्च करून बांधल्या जाणाऱ्या सात सांडपाणी प्रक्रिया केंद्रांची पायाभरणी केली.

PM Narendra Modi (Photo Credit : ANI)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. विमानतळावर त्यांचे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केले. आज त्यांनी शहरात अनेक प्रकल्प आणि विकास कामांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली.

यावेळी बीकेसी येथील कार्यक्रमाला संबोधित करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. ते म्हणाली. ‘पीएम नरेंद्र मोदी 2019 मध्ये म्हणाले होते की, डबल इंजिन सरकारने महाराष्ट्र बदलला आणि त्यांनी सरकारला पुन्हा सत्तेत आणण्यास सांगितले. त्यांच्यावर विश्वास ठेवून लोकांनी सरकारला परत सत्तेत आणले. पण काही लोकांनी फसवणूक केली आणि त्यानंतर अडीच वर्षे जनतेला न आवडणारे सरकार होते.’

ते पुढे म्हणाले, ‘परंतु बाळासाहेब ठाकरेंचे खरे अनुयायी एकनाथ शिंदे यांनी हिंमत दाखवली आणि पीएम मोदींच्या आशीर्वादाने जनतेच्या पसंतीचे सरकार पुन्हा एकदा महाराष्ट्रात आले. महाराष्ट्राने पुन्हा एकदा विकासाच्या वाटेवर वेगाने वाटचाल सुरू केली.’ यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ‘महाराष्ट्रातील जनता भाग्यवान आहे. पंतप्रधान मोदी आज (विविध प्रकल्प आणि मुंबई मेट्रोच्या दोन मार्गांचे) उद्घाटन करतील. पंतप्रधान मोदींनी हे करू नये, अशी काहींची इच्छा होती, पण उलटेच घडत आहे. पीएम मोदींच्या व्यक्तिमत्त्वात काहीतरी ऊर्जा आहे. येत्या अडीच वर्षांत या मुंबईचा कायापालट पाहायला मिळेल.’

आजच्या कार्यक्रमाला संबोधित करताना पीएम नरेंद्र मोदी म्हणाले, ‘स्वातंत्र्यानंतर प्रथमच भारत मोठी स्वप्ने पाहण्याची आणि ती पूर्ण करण्याचे धाडस करत आहे. गेल्या शतकातील प्रदीर्घ काळ गरिबीवर चर्चा करण्यात, जगाकडून मदत मिळवण्यात आणि कसेतरी जगण्यात व्यतीत झाला. परंतु आता स्वतंत्र भारताच्या इतिहासात प्रथमच जगाने भारताच्या संकल्पांवर विश्वास ठेवायला सुरुवात केली आहे. गरीबांसाठीचे पैसे भ्रष्टाचारात जात होते. करदात्यांचा पैसा असाच जात होता. याचे नुकसान करोडो भारतीयांना झाले आहे. आता यात बदल झाला आहे. बहुतांश पैसा लोकांवर खर्च होत आहे. काही काळ विकासाचे काम स्लो झाले होते. परंतू शिंदे-फडणवीसांची जोडी येताच पुन्हा वेग पकडला.’ (हेही वाचा: 'पीएम नरेंद्र मोदींचा मुंबई दौरा म्हणजे आपल्या पक्षाचा प्रचार, राज्याचा फायदा नाही'- शिवसेनचा हल्लाबोल)

ते म्हणाले, 'आज, प्रत्येकाला वाटते की भारत जलद विकास आणि समृद्धीसाठी आवश्यक काहीतरी करत आहे. आज भारत अभूतपूर्व आत्मविश्वासाने भरलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने, 'स्वराज्य' आणि 'सुराज'ची भावना आजच्या भारतातील दुहेरी इंजिन सरकारवर प्रतिबिंबित करते.'

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबई मेट्रोच्या दोन मार्गांचे उद्घाटन झाले. याच कार्यक्रमात पंतप्रधानांनी सुमारे 17 हजार 200 कोटी रुपये खर्च करून बांधल्या जाणाऱ्या सात सांडपाणी प्रक्रिया केंद्रांची पायाभरणी केली. मुंबईतील आरोग्य सेवेच्या पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी राज्य शासनाने ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरु करण्याचा निर्णय घेतला. पंतप्रधानांनी या कार्यक्रमात वीस नवीन ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’चे लोकार्पण केले. आज पीएम मोदी यांच्या हस्ते मुंबईतील सुमारे 400 किमी लांबीच्या रस्त्यांच्या काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन झाले. पंतप्रधान मोदींच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या पुनर्विकासाची पायाभरणीही झाली.