मुंबईत आजपासून प्लॅस्टिकवर कडक बंदी! वापर करताना आढळल्यास बसणार 'इतका' दंड
पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या निर्देशानुसार, आज 1 मार्च पासून पुन्हा एकदा मुंबईत प्लास्टिक बंदीची (Plastic Ban) कठोर अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या निर्देशानुसार, आज 1 मार्च पासून पुन्हा एकदा मुंबईत प्लास्टिक बंदीची (Plastic Ban) कठोर अंमलबजावणी करण्यात येणार आहे.मुंबई महापालिकेने (BMC) यासाठी कर्मचाऱ्यांची विशेष पथके नमेली असून कोणीही बंदी योग्य प्लास्टिकचा वापर करताना आढळल्यास त्यावर कडक कारवाई करण्यात येईल. या कारवाईत पहिल्यांदा दोषी आढळल्यास पाच हजार रुपये, दुसऱ्या वेळेसाठी 10 हजार रुपये आणि तिसऱ्या वेळेसाठी तब्बल 25 हजार रुपये दंड आणि तीन महिन्यांची कैद अशी शिक्षा दिली जाणार आहे. आजपर्यंत मुंबईत 86 हजार किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले असून सुमारे 4 कोटी 65 लाख रुपये दंड वसूल करण्यात आले आहे, तर आजपासून होणाऱ्या या कठोर अंलबजावणीमुळे हे आकडे वाढण्याची शक्यता आहे, दंड भरायचा नसेल तर ग्राहक, विक्रेते आणि सामान्य नागरिकांनी सुद्धा बंदी योग्य प्लास्टिकचा वापर प्रकर्षाने टाळावा असे आवाहन करण्यात आले आहे.
प्लास्टिक कपचा वापर केल्याने बीडमधील जिल्हाधिका-याने स्वत:लाच ठोठावला पाच हजार रुपयांचा दंड
प्राप्त माहितीनुसार, महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनेनुसार संपूर्ण महाराष्ट्रात प्लास्टिक (उत्पादन, वापर, विक्री, वाहतूक, हाताळणी साठवणूक) वर बंदी घातलेली आहे. या अंतर्गत बॅन असणाऱ्या गोष्टी जाणून घ्या..
- प्लास्टिकपासून बनवल्या जाणाऱ्या पिशव्या
- प्लास्टिकपासून बनविण्यात येणार्या व एकदाच वापरल्या जाणार्या टाकाऊ वस्तू जसे की ताट, कप्स्, प्लेटस, ग्लास, चमचे इत्यादी.
- हॉटेलमध्ये अन्नपदार्थ पॅकेजिंगसाठी वापरल्या जाणार्या प्लास्टिकच्या वस्तू
- द्रव पदार्थ साठविण्यासाठी वापरात येणारे कप किंवा पाऊच
- सर्व प्रकारचे अन्नपदार्थ, धान्य इत्यादी साठविण्यासाठी आणि पॅकेजिंगसाठी वापरले जाणारे प्लास्टिक
- प्लास्टिकचे कव्हर
दरम्यान, 1 मार्चपासून कारवाई तीव्र करण्यासाठी 24 विभाग कार्यालयातील अनुज्ञापन, आरोग्य, बाजार, दुकाने व आस्थापना, शिक्षण या विभागांतील अधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपवण्यात आली असून या कर्मचाऱ्यांची विशेष धाड पथके तयार करण्यात आली आहेत, हे पथक विविध आस्थापना, कार्यालये, मॉलवर धाड टाकून कारवाई करणार आहे. विद्यार्थ्यांना प्लास्टिक न वापरण्याची शपथ देणे, विद्यार्थ्यांच्या घरातील प्लास्टिक पालिका शाळेत आणून जमा करणे, प्लास्टिक बंदीसाठी स्पर्धा आयोजित करणे आदी उपक्रम शिक्षण विभागामार्फत राबविण्यात येणार आहेत.