Parliament Session: केंद्राने महाराष्ट्राला पुरवलेले 60% व्हेंटिलेटर बिनकामाचे; शिवसेना खासदार विनायक राऊत यांचा मोदी सरकारवर निशाणा

संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात लोकसभेमध्ये देशातील कोविड परिस्थितीवर (Covid in India) चर्चा सुरु होती.

Vinayak Raut | (Photo Credit: Lok Sabha)

शिवसेना (Shiv Sena) खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी कोरोना व्हायरस महामारी हाताळणीवरुन केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात लोकसभेमध्ये देशातील कोविड परिस्थितीवर (Covid in India) चर्चा सुरु होती. या वेळी विनायक राऊत यांनी केंद्रातील मोदी सरकारवर घणाघात करत म्हटले की, केंद्राने महाराष्ट्राला पुरविण्यात आलेले 60% व्हेंटीलेटर (Ventilators Unoperational) खराब होते. महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशात कोरोना महामारी अत्युच्च टोकाला होती. अशा वेळी पीएम केअर (PM Cares) अंतर्गत केंद्राने महाराष्ट्राला व्हेंटीलेटर वाटप केले. पण यातील जवळपास 60% व्हेंटीलेटर्स कामच करत नव्हते. ते दुरुस्त करण्यासाठी योग्य वेळी टेक्निशियनही पोहोचत नव्हते. या प्रकाराची केंद्र सरकारने चौकशी करावी, अशी मागणीही राऊत यांनी या वेळी केली.

महाराष्ट्राने कोरोना काळात अत्यंत भक्कम भूमिका घेतली. मुंबईसाख्या आव्हान असलेल्या शहरामध्येही धारावी पॅटर्न राबवला. ज्याची आंतरराष्ट्रीय पातळीवरही मोठी दखल घेण्यात आली. आम्ही देशातील कोरोना स्थितीवर संसदेत चर्चा व्हावी असे पाठीमागील वर्शीच म्हटले होते. मात्र, ही चर्चा होऊ शकली नाही. आता जवळपास दीड वर्षांनी या विषायावर चर्चा होते आहे. जर त्याच वेळी संसदेत कोविड या विषयावर चर्चा झाली असती तर देशाची स्थिती आज वेगळी असती. (हेही वाचा, Maratha Reservation:सोन्याचं ताट रिकामं असेल तर खायचं काय? शिवसेना खासदार विनायक राऊत आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक)

विनायक राऊत यांनी लोकसभेत केंद्राकडे मागणी केली की, ओमिक्रॉन नावाचा नवा कोविड स्ट्रेन दक्षिण अफ्रिकी देशांमध्ये आला आहे. हा स्ट्रेन भारतातही आल्याचे सांगितले जात आहे. पण अद्यापही कोणाकडून अधिकृत माहिती मिळत नाही. जगभरातील 23 देशांमध्ये हा स्ट्रेन पसरल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे केंद्र सरकारने एक निश्चित अशी ठोस नियमावली आखावी आणि ती सर्व राज्ये आणि प्रसारमाध्यमांनीही वापरणे बंधनकारक करावे, अशी मागणी विनायक राऊत यांनी केली आहे.