मुंबई: शरद पवार यांनी बोलावलेल्या चिंतन बैठकीवेळी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

अखेर पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर हा वात त्या ठिकाणी थांबला. मात्र, या प्रकारामुळे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाबाहेर (NCP Office Mumbai) मात्र तणाव निर्माण झाला.

Nationalist Congress Party chief Sharad Pawa | (Photo Credits-Facebook)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (Nationalist Congress Party) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar यांनी बोलावलेल्या चिंतन बैठकीवेळी कार्यकर्त्यांमध्ये रविवारी (23 जून 2019) जोरदार राडा झाला. कार्यकर्त्यांनी एकमेकांशी मुद्द्यांऐवजी थेट गुद्द्यांचीच भाषा केली. लोकसभेतील पराभवावर चिंतन करण्यासाठी मुंबई (Mumbai) येथे ही बैठक आयोजित करण्यात आली होती. दरम्यान, या बैठकीसाठी मराठवाड्यावरुन आलेल्या कार्यकर्त्यांमध्ये परभणी लोकसभा मतदारसंघात पक्ष उमेदवारांचा पराभव नेमका कुणामुळे झाला यावर वाद झाला. सुरुवातीला शाब्दीक बाचाबाची स्वरुपात असलेला हा वाद थेट हाणामारीपर्यंत पोहोचला. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर हा वात त्या ठिकाणी थांबला. मात्र, या प्रकारामुळे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाबाहेर (NCP Office Mumbai) मात्र तणाव निर्माण झाला.

लोकसभा निवडणूक 2019 मध्ये झालेला पराभव राष्ट्रवादी काँग्रेस आणि पक्षनेतृत्वाच्या चांगलाच जिव्हारी लागल्याचे दिसते. त्यामुळे पक्षाने जोरदार आत्मचिंतन करण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी पक्षाने राष्ट्रीय, प्रादेशिक आणि जिल्हा-तालुका पातळीवरही विचारमंधन करण्यास सुरुवात केली आहे. तसेच, पक्षनेतृत्वाने आगामी विधानसभा डोळ्यासमोर ठेऊन या पराभवाचे कडक विश्लेषण करण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमिवर मुंबईत चिंतन बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह अनेक नेते उपस्थित आहेत. (हेही वाचा, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांना म्हणतात 'आरएसएस कडून शिका')

दरम्यान, उस्मानाबाद, परभणी, बीड लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद आहे. मात्र, असे असतानाही या मतदारसंघात पराभव स्वीकारावा लागला. या पराभवाचे कारण नेमके कारण काय हा कळीचा मुद्दा आहे. दरम्यान, राष्ट्रवादीमध्ये या मतदारसंघात पक्षांतर्गत कलहही जोरात आहे. या कलहाला कंटाळून पक्षावर टीका करत बीड जिल्ह्यातील नेते जयदत्त क्षीरसागर यांनी पक्षांतर करत शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे आता पुन्हा एकदा नव्या दमाने उभे राहण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला चांगलेच प्रयत्न करावे लागणार आहेत.