Param Bir Singh ते Rashmi Shukla या 4 पोलिस अधिकार्यांमुळे 'ठाकरे सरकार' आलयं अडचणीत तर BJP पुन्हा आक्रमक!
सध्या पोलिस दलात होत असलेल्या खळबळजनक गौप्यस्फोटांमुळे राजकीय क्षेत्रातही फटकेबाजी सुरू आहे.
महाराष्ट्रात 28 नोव्हेंबर 2019 दिवशी शिवतीर्थावर महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) च्या नावाने शिवसेना, एनसीपी आणि कॉंग्रेस एकत्र आली. पण चार महिन्यांतच कोविड 19 चं संकट सुरू झालं आणि 'वॉर अगेन्स्ट वायरस' ला सुरूवात झाली. आता कोविड 19 ला वर्षपूर्ती होत नाही तोपर्यंत राज्यात ठाकरे सराकारची कसोटी घेण्यासाठी पोलिस अधिकार्यांच्या बदल्या, फोन टॅपिंग प्रकरण आणि हप्तेखोरीचे आरोप करत महाविकास आघाडीला धारेवर धरण्यासाठी भाजपाकडून प्रयत्न सुरू झाले आहेत. सध्या पोलिस खात्यामधील खळबळजनक घडामोडी समोर येत आहेत आणि याला कारण ठरली ती अॅन्टिलिया केस (Antilia Case). फेब्रुवारी महिन्यात उद्योगपती मुकेश अंबानीच्या (Mukesh Ambani) घराजवळ स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली आणि राज्यात राजकीय फटाकेबाजीची सुरूवात झाली आहे. याची सुरूवात सचिन वाझे (Sachin Waze) पासून झाली पुढे परमबीर सिंग (Parambir Singh), रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) आणि सुबोध कुमार जयस्वाल (Subodh Kumar Jaiswal) असे बडे अधिकारी यांची नावं आली. पण ठाकरे सरकारची (Thackeray Sarkar) डोकेदुखी ठरलेली ही अधिकारी मंडळी नेमकी कोण आणि मागील काही दिवसांत सातत्याने या नावांची चर्चा का होतेय?
दरम्यान महाविकास आघाडीच्या नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्येही 'सरकार काही अधिकार्यांना ओळखण्यामध्ये कमी पडलं' अशी अनेकांनी प्रतिक्रिया दिल्याचं मंत्री जितेंद्र आव्हाडदेखील म्हणाले आहेत. मग पहा हे अधिकारी नेमके आहेत कोण. Mumbai Police Transfer: सचिन वाझे प्रकरणाचे पडसाद, मुंबई पोलीस दलात बदलीची लाट; 65 पोलीस अधिकाऱ्यांची उचलबांगडी.
सचिन वाझे
सचिन वाझे यांच्यापासूनच सार्या नाट्यमय घडामोडींना सुरूवात झाली आहे. मुंबई पोलिस दलात API दर्जाचे सचिन वाझे यांची कारकीर्द वादग्रस्त आहे. त्यांचे 17 वर्ष निलंबन, कोरोना संकटात पुन्हा पोलिस दलात रूजू होणं आणि क्राईम ब्रांच सारखं संवेदनशील खातं मुख्य अधिकारी म्हणून सांभाळणं यावरून भाजप महाविकास आघाडी सरकार वर आक्रमक झालं आहे. सध्या ते NIA च्या अटकेत आहेत आणि अॅन्टिलिया केस, मनसुख हिरेन केस मध्ये त्यांचा संबंध यावरून तपास, चौकशी केंद्रीय तपास यंत्रणेकडून सुरू आहे. सचिन वाझेंची शिवसेनेसोबतची जवळीक देखील चर्चा विषय ठरत आहे. Antila Bomb Scare Case: सचिन वाझे यांच्या घरातून सापडली 62 काडतुसे; तपासात मदत करत नसल्याचा वकिलांचा आरोप.
परमबीर सिंह
सचिन वाझेंच्या मुंबई पोलिस दलात पुन्हा नियुक्तीला परमबीर सिंह जबाबदार आहेत असं म्हणत सरकारने सुरूवातीला आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला होता. पण गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सिंह यांच्या बदलीमागे त्यांच्याच काही अक्षम्य चूका असल्याचं सांगितलं गेल्याने खवळलेल्या परमबीर सिंह यांनी ठाकरे सरकार वर लेटर बॉम्ब करत अनिल देशमुखांवर 100 कोटींच्या हप्तेवसुलीचे गंभीर आरोप केले. एकेकाळी ठाकरे सरकरच्या जवळ असलेले आयपीएस ऑफिसर परमबीर सिंह यांनी आता त्यांच्या बदलीवरून न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत.
रश्मी शुक्ला
रश्मी शुक्ला या महिला आयपीएस ऑफिसर हे ट्रम्प कार्ड वापरत भाजपाने ठाकरे सरकार वर मोठा हल्लाबोल केला आहे. रश्मी शुक्ला यांनी फोन टॅपिंग करत पोलिस खात्यामध्ये बदलीदरम्यान मोठे आर्थिक व्यवहार होत असल्याचा अहवाल सरकार समोर मांडला. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या अहवालाकडे दुर्लक्ष करत आपलं सरकार वाचवण्याचा प्रयत्न केल्याचं विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचं मत आहे. तर राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटेंच्या अहवालानुसार रश्मी शुक्लांकडून गोपनीय अहवाल लीक झाल्याचा संशय आहे तसेच चूकीच्या पद्धतीने वारंवार फोन टॅपिंग केल्याचं सांगण्यात आले आहेत. सध्या रश्मी शुल्का या केंद्रात काम करत आहेत. पण त्यांनी राज्यात गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्त म्हणून केलेल्या कार्यकाळातील गोष्टींनी सरकार वर निशाणा साधण्याचं काम सुरू आहे. Rajendra Patil Yadravkar On Rashmi Shukla: काय सांगता? रश्मी शुक्ला यांनी खरोखरच राजेंद्र पाटील यड्रावकर यांना फोन केला होता? जाणून घ्या सत्य.
सुबोध कुमार जयस्वाल
सुबोध कुमार जयस्वाल यांनी खरंतर ठाकरे सरकारच्या कामकाजांवर सर्वात पहिल्यांदा बोटं ठेवलं होतं. राज्यात महाराष्ट्र पोलिस महासंचालक पदावर असलेल्या सुबोध कुमार यांनी राज्यात काम करताना राजकारणामुळे त्रास असल्याचं कारण पुढे करत केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) महासंचालकपदी जाण्याचा निर्णय घेतला. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्या दाव्यानुसार सुबोध कुमारांनी देखील पोलिस खात्यातील बदल्यांच्या रॅकेटचा अहवाल त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिला होता.
महाराष्ट्रात सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या आहेत. काही प्रमाणात डॅमेज कंट्रोल करण्यासाठी सरकारने पोलिस दलात महत्त्वाच्या खात्यांमध्ये बदलींचे सत्र सुरू केले आहे. पण यामुळे पोलिस दलाची प्रतिमा डागळत असल्याची आणि पोलिसांचे मनोधैर्य खचत असल्याची देखील चर्चा आहे. अद्याप कोणत्याही पोलिस अधिकार्यावर आरोप सिद्ध झालेले नाहीत. जसा तपास पुढे जाईल आणि न्यायलयीन प्रकरण पुढे सरकेल तसा अनेक गोष्टींचा खुलासा होण्याची शक्यता आहे.