डीआयजी निशिंकात मोरे यांची अटक अटळ; पनवेल कोर्टाने अटकपूर्व जामीन फेटाळला; पीडितेच्या कुटुंबाला धमकी देणारा दिनकर साळवे निलंबीत

मोरे यांनी एका तरुणीशी अश्लील वर्तन करत तिच्या चेहऱ्याला लावलेला केक चाटण्याचा प्रयत्न केला. तसेच, पीडितेला अवघडल्यासारखे वाटेल असे वर्तन केले, असा त्यांच्यावर आरोप आहे.

DIG Nishikant More in Sexual Misconduct Case | (Photo Credit: Archived, edited, representative images)

अल्पवयीन तरुणीचा विनयभंग आणि तिच्यासोबत अश्लिल वर्तन केल्याचा आरोप असलेल्या पोलीस उपमहानिरीक्षक निशिकांत मोरे (DIG Nishikant More) यांचा जामीन अर्ज पनवेल कोर्टाने फेटाळला आहे. डीआयजी निशिकांत मोरे यांच्यावरील जामीन अर्जावर युक्तीवाद पूर्ण झाल्यावर पनवेल कोर्ट (Panvel Court) काय निर्णय देते याकडे लक्ष लागले होते. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी डीआयजी मोरे यांना अटक करणे आवश्यक असल्याची मागणी तपास अधिकाऱ्यांनी केली होती. ही मागणी मान्य करत पनवेल कोर्टाने डीआयजी निशिंकात मोरे यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला. दरम्यान, पीडितेच्या कुटुंबाला धमकी देणारा मुख्यमंत्र्यांच्या वाहन ताफ्यातील वाहन चालक दिनकर साळवे यालाही राज्याच्या गृहविभागाने निलंबीत केले आहे.

प्राप्त माहितीनुसार, निशिकांत मोरे हे पुणे वाहतूक विभागात पोलीस उपमहानिरीक्षक पदावर काम करतात. मोरे यांनी एका तरुणीशी अश्लील वर्तन करत तिच्या चेहऱ्याला लावलेला केक चाटण्याचा प्रयत्न केला. तसेच, पीडितेला अवघडल्यासारखे वाटेल असे वर्तन केले, असा त्यांच्यावर आरोप आहे. प्राप्त माहितीनुसार हे प्रकरण जून 2019 मध्ये तळोजा परिसरात घडले होते. पोलीस दलात अगदी वरीष्ट पदावर कार्यरत असल्यामुळे निशिकांत मोरे यांच्या विरोधात कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप केला जात होता.

दरम्यान, राज्याच्या गृहविभागाने निशिकांत मोरे अल्पवयीन तरुणी विनयभंग प्रकरणाची गंभीर दखल घेत मुख्यमंत्र्यांच्या वाहन ताफ्यातील चालक दिनकर साळवे याला निलंबीत केले आहे. निशिंकात मोरे प्रकरणात साळवी याने पीडितेच्या कुटुंबाला धमकी दिल्याचा आरोप आहे. जास्त बोलायचे नाही. गप्प राहायचं अशी धमकी साळवे याने दिल्याचा आरोप पीडितेच्या कुटुंबीयांनी केला आहे. (हेही वाचा, पनवेल: पोलीस उपमहानिरीक्षक निशिकांत मोरे अश्लील वर्तन प्रकरणातील तरुणी बेपत्ता; घरात सुसाईड नोट सापडली)

दरम्यान पनवेल कोर्टाने जामीन अर्ज फेटाळून लावल्याने निशिकांत मोरे याची अटक आता अटळ ठरली आहे. हे प्रकरण बरेच जुणे असून, मोरे हे केवळ पोलीस दलात वरिष्ठ पदावर कार्यरत असल्यामुळेच त्यांच्यावर कारवाई होत नाही. त्यांना पोलिसांकडून जाणीवपूर्वक पाठीशी घातले जात असल्याचा आरोप होता. प्रसारमाध्यमांनी आणि काही संघटनांनी हे प्रकरण उचलुन धरले होते.