महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019: उस्मानाबद जिल्ह्यातील मतदारसंघ, उस्मानाबाद, परांडा,तुळजापूर यांसह इतर जागांवरील उमेदवार यादी, लढत आणि राजकीय इतिहास घ्या जाणून
त्यामुळे या वेळी चारपैकी किती विद्यमान आमदार पुन्हा विधानसभेत जाणार आणि किती घरी बसणार याबाबत उत्सुकता आहे. जाणून घेऊया उस्मानाबाद जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांचा हा आढावा.
Maharashtra Assembly Elections 2019: मराठवाड्यातील महत्त्वाचा आणि चर्चेत असलेला एक जिल्हा म्हणजे उस्मानाबद (Osmanabad). या जिल्ह्यात विधानसभेचे एकूण चार मतदारसंघ येतात. परांडा (Paranda), उस्मानाबद, तुळजापूर (Tuljapur), उमरगा (Umarga)अशी या मतदारसंघांची नावे आहेत. उस्मानाबाद जिल्ह्याच्या राजकारणाचे वैशिष्ट्य असे की, जिल्ह्यात राजकारण करणाऱ्या मातब्बर नेत्यांची संख्या आहे नऊ आणि विधानसभा मतदारसंघ आहेत अवघे चार. त्यामुळे या वेळी चारपैकी किती विद्यमान आमदार पुन्हा विधानसभेत जाणार आणि किती घरी बसणार याबाबत उत्सुकता आहे. जाणून घेऊया उस्मानाबाद जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांचा हा आढावा.
परांडा विधानसभा मतदारसंघ
परांडा विधानसभा मतदारसंघाचा इतिहास पाहता इथे शक्यतो एकच उमेदवार दोन वेळेपेक्षा अधिक वेळा निवडणूक येत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राहुल मोटे यांनी मात्र हा इतिहास बदलत 2004,2009 आणि 20014 अशा तीन वेळा बाजी मारली. त्यांची ही कामगिरी म्हणजे विजयी हॅटट्रीक होती. 2014 मध्ये राहुल मोटे हे 78,548 मते मिळवत विजयी झाले. त्यांनी शिवसेनेच्या ज्ञानेश्वर पाटील यांचा 12,389 मतांनी पराभव केला. पाटील यांना 66,159 मते पडली. या वेळी सामना मोठा अटीतटीचा आहे. त्यामुळे परांडाकर कोणाला संधी देतात याबाबत उत्सुकता आहे.
परांडा विधानसभा निवडणूक 2014 निकाल
राहुल मोटे, राष्ट्रवादी – 78,548
ज्ञानेश्वर पाटील, शिवसेना – 66,159
बाळासाहेब पाटील, रासप – 37,324
निरुद्दीन चौधरी, काँग्रेस – 7,760
गणेश शेंडगे, मनसे – 2,426
उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघ
उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघ हा तसा हाय होल्टेज मतदारसंघ. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला. या मतदारसंघावर पद्मसिंह पाटील यांचे नेहमीच वर्चस्व राहिले आहे. पद्मसिंह पाटील म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नते आणि माजी गृहमंत्री. सध्या पद्मसिंह पाटील यांचे चिरंजीव राणाजगजीतसिंह पाटील हे इथले विद्यमान आमदार आहेत. त्याआधी डॉ. पद्मसिंह पाटील यांनी इथे अनेक इथून आमदारकी मिळवली आहे. 1978 ते 2014 असे प्रदीर्घ काळ पद्मसिंह हे इथून आमदार राहिले आहेत. अपवाद केवळ 2009 मधील विधानसभा निवडणुकीचा.
विधानसभा निवडणूक 2014 निकाल
राणा जगजितसिंह पाटील, राष्ट्रवादी – 88,469
ओम राजेनिंबाळकर, शिवसेना – 77,663
संजय दुधगावकर, भाजप – 26,081
विश्वास शिंदे, काँग्रेस – 9,081
अकबर खान पठाण, एमआयएम – 4,555
तुळजापूर विधानसभा मतदारसंघ
तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचा इतिहास पाहता हा मतदारसंघावर प्रामुख्याने शेतकरी कामगार पक्ष आणि काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. 1990 पासून मात्र हा मतदारसंघ थेट काँग्रेसकडेच राहिला आहे. 1990 पासून काँग्रेस पक्षाचे मधुकरराव चव्हाण हे या मतदारसंघाचे आमदार राहिले आहेत. याही वेळी काँग्रेसने मधुकरराव चव्हाण यांनाच निवडणुकीचे तिकीट दिले आहे. मधुकरराव चव्हाण यांचे वय 85 वर्षांहून अधिक आहे. या वेळी त्यांच्या विरोधात राणाजगजीतसिंह पाटील हे निवडणूक लढवणार आहेत. राणाजगजीतसिंह पाहिल यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत नुकताच भाजप प्रवेश केला आहे.
तुळजापूर विधानसभा निवडणूक 2014 निकाल
मधुकरराव चव्हाण, काँग्रेस – 70,701
जीवनराव गोरे, राष्ट्रवादी – 41,091
संजय निंबाळकर, भाजप – 36,380
देवाचंद रोचकरी, मनसे – 35,895
सुधीर पाटील, शिवसेना – 24,991
उमरगा विधानसभा मतदारसंघ
उमरगा विधानसभा मतदारसंघ साधारण 1990 पासून शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. शिवसेनेचे ज्ञानराज चौगुले हे इथले विद्यमान आमदार आहेत. 2014 च्या निवडणुकीत चौगुले यांनी काँग्रेसच्या किसन कांबळे यांचा पराभव केला होता. चौगुले यांना 65,178 तर, काँग्रेस यांना 44,736 मते मिळाली होती.
उमरगा विधानसभा मतदारसंघ निवडणूक 2014 निकाल
ज्ञानराज चौगुले, शिवसेना – 65,178
किसन कांबळे, काँग्रेस – 44,736
कैलास शिंदे, भाजप – 30,521
संजय गायकवाड, राष्ट्रवादी – 15,569
दत्ता गायकवाड, बसपा – 1,675
दरम्यान, या वेळी विधानसभा निवडणूक प्रक्रियेत महाराष्ट्रात 8 कोटी 94 लाख मतदार मतदान करतील. महाराष्ट्रात 288 मतारसंघासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडेल. 27 सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. 4 ऑक्टोबर हा निवडणूक अर्ज दाखल करण्यासाठी अंतिम दिवस असेल. 7 ऑक्टोबर पर्यंत दाखल केलेले आणि छाननीमध्ये टिकलेले उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. त्यानंतर 21 ऑक्टोबर या दिवशी प्रत्यक्ष मतदान तर, 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी पार पडणार आहे.