Orange Gate–Marine Drive Twin Tunnel Project: मुंबईतील वाहतूक कोंडी सुटणार, मरिन ड्राईव्हला सहा पदरी समांतर सहा पदरी रस्ता, दुहेरी बोगदा प्रकल्पाच काम लवकरच होणार सुरू
मुंबईत वाहतूक कोंडी ही मोठी समस्या आहे. ही समस्या सोडवण्यासाठी ठोस उपाययोजना म्हणून पायाभूत सुविधांच्या विकास कामांना प्राधान्यक्रम देण्यात येत आहे.
Orange Gate–Marine Drive Twin Tunnel Project: मुंबईतील वाढत्या वाहतूक समस्यांवर ठोस उपाययोजना म्हणून पायाभूत सुविधांच्या विकासाला प्राधान्यक्रम देण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह (Marine Drive) दरम्यान नागरी रस्ता बोगदा प्रकल्प विकसित करण्यात येत आहे. एनसीपीएदरम्यान सागरी किनारा मार्गाच्या बाजूने नवीन सहा पदरी रस्ता बांधण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या प्रारंभिक कामे प्रगतीपथावर आहेत. हा प्रकल्प कालबद्ध नियोजनात पूर्ण करावा,असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी दिले आहेत. संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करून प्रकल्प वेळेत पूर्ण करावा, असेही निर्देश दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह प्रकल्पासंदर्भात आढावा बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे घेण्यात आली. त्यात मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, 'रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तसेच पूर्व मुक्तमार्ग आणि अटल सेतूसोबत अखंड जोडणी निर्माण करण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा आहे. सध्या प्रारंभिक कामे प्रगतीपथावर असून टनेल बोरिंग मशीनचे कार्य, जमीन हस्तांतरण आणि पाइल फाउंडेशनची कामे वेगाने सुरू आहेत. वाहतूक विभागासोबत सातत्याने समन्वय ठेवून सुधारित तांत्रिक प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. एस. व्ही. पटेल रस्ता आणि मरीन ड्राइव्ह येथे आवश्यक त्या सुधारणा आणि विस्तारिकरणाची कामे नियोजनानुसार करण्यात यावीत.
हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर दक्षिण मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होणार आहे. याशिवाय प्रदूषणाच्या पातळीत घट होऊन वाहतूक व्यवस्थेला शिस्तबद्ध दिशा मिळेल. दक्षिण मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेत नवा आयाम देणारा आणि आर्थिक तसेच भौगोलिक दृष्टीने शहराच्या विकासाला वेग देणारा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. हा प्रकल्प पूर्णत्वास गेल्यानंतर मुंबईतील वाहतूक व्यवस्था अधिक सुलभ होण्याबरोबर प्रवाशांच्या वेळ आणि खर्चात बचत होईल. हा प्रकल्प डिसेंबर 2028 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करावे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
(The above story first appeared on LatestLY on Apr 13, 2025 10:06 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

