विरोधकांचे अंतर्विरोधाच्या चिपळ्या वाजविण्याचे धंदे सुरूच- सामना अग्रलेख

विरोधकांचे अंतर्विरोधाच्या चिपळ्या वाजविण्याचे धंदे सुरूच आहेत. ही चिपळ्या वाजवायची वेळ आहे का?,” असा सवाल करत शिवसेनेने (Shivsena) विरोधकांवर टीकेचा बाण सोडला आहे.

विरोधकांचे अंतर्विरोधाच्या चिपळ्या वाजविण्याचे धंदे सुरूच- सामना अग्रलेख

एकीकडे संपूर्ण देश कोरोना व्हायरस (Coronavirus) विषाणू विरोधात लढा देत आहे तर दुसरीकडे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळातील सरकार विरुद्ध विरोधक हा लढा देखील सुरुच आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून महाविकासआघाडीमध्ये अंतर्गत वाद सुरु असल्याच्या चर्चा सुरु होत्या. त्यात विरोधकांनी या चर्चांना खतपाणी घेत वारंवार ही गोष्ट लोकांच्या समोर आणली आहे. म्हणूनच आज दै.सामनाच्या (Saamna) अग्रलेखातून विरोधकांवर निशाणा साधत यावर सणसणीत उत्तर देण्यात आले आहे. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी आमच्यात कोणताही अंतर्विरोध नाही, असे सांगितले आहे. मात्र तरीही विरोधकांचे अंतर्विरोधाच्या चिपळ्या वाजविण्याचे धंदे सुरूच आहेत. ही चिपळ्या वाजवायची वेळ आहे का?,” असा सवाल करत शिवसेनेने (Shivsena) विरोधकांवर टीकेचा बाण सोडला आहे.

काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी सरकारमध्ये कोणताही अंतर्गत विरोध नसल्याचं सांगत चर्चांवर पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. यावरून आता शिवसेनेनंदेखील विरोधकांवर निशाणा साधला आहे. “चिनी सैन्यानं गलवान खोऱ्यातून माघार घेतली पण सरकार पाडण्याच्या मोहिमेतून फडणवीस व त्यांचे लोक माघार घ्यायला तयार नाहीत,” असं म्हणत शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून विरोधकांवर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्तक्षेपानंतर महाराष्ट्र शासनाकडून मुंबई पोलीस उपयुक्तांच्या बदल्यांना स्थगिती

काय म्हटलंय सामना अग्रलेखात?

सरकारमधील तीन प्रमुख पक्षांचे अजिबात पटत नाही व अनेक निर्णयांवर मतभेद आहेत. त्यामुळे शरद पवार हे शिष्टाई करण्यासाठी ‘मातोश्री’वर गेले. तीन पक्षांत समन्वयाचा अभाव असून पडद्यामागे बरेच काही सुरू असल्याचे बोलले जात आहे. या सगळ्या रिपरिप बातम्यांत काडीमात्र तथ्य नाही. शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्या प्रयत्नांतून राज्यात ठाकरे सरकार अवतरले आहे. शरद पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अधूनमधून भेटत असतात. त्या प्रत्येक भेटीत कसली शिष्टाई असणार? शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे, सहकार क्षेत्रातले प्रश्न घेऊन पवार हे मुख्यमंत्र्यांना अधूनमधून भेटतात. त्यास जर कोणी ‘शिष्टाई’, ‘मध्यस्थी’ वगैरे शब्दांचे अलंकार लावीत असतील तर ते अलंकार त्यांचे त्यांनाच लखलाभ ठरोत.

मुंबई पोलीस दलातील बदल्यांचा गोंधळ झाला व त्या बदल्यांतून अविश्वासाचे वातावरण उघड झाले, असे आपले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सांगत आहेत. त्यात तथ्य आहे असे वाटत नाही व त्याबाबत मनधरणी वगैरे करण्यासाठी गृहमंत्री देशमुख पवारांना घेऊन ‘मातोश्री’वर पोहोचले, असे सांगणे व छापणे हेच मुळी मानसिक गोंधळाचे लक्षण आहे. दोन-चार बदल्या आणि बढत्यांच्या वादांतून आघाडीची सरकारे कोसळू लागली तर देशाचे राजकारण ठिसूळ पायावर उभे आहे असे समजावे लागेल.

कोरोना हे देशावरील संकट आहे. त्यामुळे या लढाईत लहानसहान फुसकुल्या सोडून वातावरणात दुर्गंधी आणण्याचे काम कोणी करू नये. विरोधकांच्या नजरेत जो गोंधळ किंवा अंतर्विरोध वाटतो, ते प्रत्यक्षात सरकारातील जिवंतपणाचे लक्षण असू शकते. त्यांना काही चुकीचे किंवा धूसर दिसत असेल तर त्यांनी डोळ्यांची तपासणी करणे व चष्म्याचा नंबर बदलून घेणे हा त्यावरचा एक उपाय आहे व त्याबाबत विरोधी पक्षाने हेळसांड करू नये असा सल्ला विरोधी पक्षाला या अग्रलेखातून देण्यात आला आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jul 08, 2020 09:08 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).