आनंदाची बातमीः मुंबईमध्ये तब्बल 3 महिन्यानंतर एका दिवसात फक्त 700 कोरोना विषाणू रुग्णांची नोंद; आज शहरात झाल्या सर्वाधिक 8776 चाचण्या
कोरोनाशी लढा देण्यासाठी सध्या महाराष्ट्र सरकार आक्रमकरीत्या अनेक उपयोजना राबवत आहे.
देशात कोरोना विषाणूचा (Coronavirus) धोका निर्माण झाल्यावर बघता बघता महाराष्ट्र (Maharashtra) आणि मुख्यत्वे मुंबई (Mumbai) मध्ये या संसर्गाचे प्रमाण अल्पावधीत खूप वाढले. कोरोनाशी लढा देण्यासाठी सध्या महाराष्ट्र सरकार आक्रमकरीत्या अनेक उपयोजना राबवत आहे. मुंबईकडे विशेष लक्ष दिले जात आहे. अशात गेले कित्येक आठवडे मुंबईमध्ये दररोज हजाराच्या संख्येने कोरोनाचे रुग्ण आढळत होते. मात्र आज पहिल्यांदाच मुंबईमध्ये कोरोना विषाणूच्या फक्त 700 रुग्णांची नोंद झाली आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी याबाबत ट्वीटद्वारे माहिती दिली आहे.
आज आढळलेले 700 रुग्ण हे गेल्या 100 दिवसांमधील सर्वात कमी रुग्णसंख्या आहे. महत्वाचे म्हणजे आज मुंबईमध्ये आजपर्यंतच्या एका दिवसातील सर्वात जास्त चाचण्या, 8776 झाल्या आहेत. याबाबत आदित्य ठाकरे म्हणतात, ‘आनंदाची बातमीः मुंबईत आज कोरोना विषाणूची फक्त 700 प्रकरणे समोर आली आहेत आणि तीही एकाच दिवसात मुंबईत आजवरच्या सर्वाधिक, 8776 चाचण्या पार पडल्यावर. अशाप्रकारे पूर्ण क्षमतेने 'चेस द व्हायरस' सुरु आहे व हा 3 महिन्यांनंतरचा मोठा दिलासा आहे. खबरदारी: गार्डसना मान खाली घालायला लावू नका. तुमचे मास्क काढू नका फक्त कोरोना रुग्णांची संख्या कमी करा!’
पहा आदित्य ठाकरे ट्वीट -
मुंबईत चाचणी क्षमता वाढल्यामुळे कोरोना सकारात्मक रुग्णांचा दर कमी झाला आहे. बीएमसी आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, सध्या मुंबईत कोरोनाचा सकारात्मकता दर 20 टक्क्यांपेक्षा कमी आहे, म्हणजेच चाचणी केलेल्या प्रत्येक 100 नमुन्यांपैकी 20 पेक्षा कमी रुग्ण पॉझिटिव्ह म्हणून समोर येत आहेत. मे महिन्यात हा दर 40 टक्के होता, तर 22 मे रोजी तो 50 टक्क्यांच्या वर गेला होता.
कालच्या आकडेवारीनुसार, मुंबई जिल्ह्यातील बरे झालेल्या रुग्णांचा दर 73 टक्के झाला आहे. 20 जुलै ते 26 जुलै पर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर 1.03 टक्के राहिला आहे. 26 जुलै 2020 पर्यंत मुंबईमध्ये झालेल्या कोविड च्या एकूण चाचण्या 4,85,563 इतक्या आहेत. मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा दर आता 68 दिवस झाला आहे. (हेही वाचा: महाराष्ट्र पोलीस दलात 24 तासात 138 नवे कोरोना रुग्ण, 3 मृत्यू; पहा एकूण आकडेवारी)
तज्ज्ञांनी सांगितले आहे की, जर ग्रोथ रेटमध्ये घट आणि रिकव्हरी रेटसह पॉजिटिव्हिटी रेटमध्ये घट झाली तर ते एक सकारात्मक लक्षण मानले जाऊ शकते. मुंबईमध्ये सध्या हे घडत असल्याचे दिसत आहे, मात्र तरी लोकांना अजूनही सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.