COVID-19: धारावीत आढळला कोरोनाचा आणखी एक रुग्ण; एका 35 वर्षीय डॉक्टरची टेस्ट पॉझिटिव्ह

चीनमध्ये जन्मलेल्या कोरोना विषाणूने आता भारतातही घुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधीत रुग्णांच्या आकड्यात झपाट्याने वाढ होऊ लागल्याने सर्वत्र चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे.

Coronavirus Outbreak (Photo Credits: IANS)

कोरोना विषाणूने (Coronavirus) संपूर्ण जगात थैमान घातला आहे. चीनमध्ये जन्मलेल्या कोरोना विषाणूने आता भारतातही घुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधीत रुग्णांच्या आकड्यात झपाट्याने वाढ होऊ लागल्याने सर्वत्र चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु असतानाही रुग्णांच्या संख्येत सकारात्मक बदल झाला नाही. यातच मुंबई (Mumbai) येथील धारावी (Dharavi) परिसरात आणखी एक कोरोनाबाधीत आढळून आला आहे. एका 35 वर्षीय डॉक्टरची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. संबंधित डॉक्टरच्या कुटुंबियांना क्वारन्टाईन (Quarantine) करण्यात आले असून आज त्यांची तपासणी केली जाणार आहे. तसेच डॉक्टरांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेतला जात आहे. कोरोना विषाणूचा वाढत्या प्रादुर्भावामुळे खबरदारीचा उपाय म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिकडून धारावी परिसर सील करण्यात आले आहे.

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून ठोस पावले उचलली जात आहेत. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी सुरुवातीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात जमावबंदी कायदा लागू केला होता. त्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यानी 24 मार्च रोजी संपूर्ण देशात 21 दिवसांकरिता संचारबंदी घोषीत केली. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र भितीजनक वातावरण निर्माण झाली असून महाराष्ट्रातील कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या 423 वर पोहचली आहे. भारतात कोरोना विषाणूची संख्या 2 हजार 069 वर पोहचली आहे. तर, कोरोनामुळे आतापर्यंत 53 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तसेच 151 नागरिकांची कोरोनाच्या जाळ्यातून सुटका झाली आहे. हे देखील वाचा- Coronavirus: दिल्लीतील निजामुद्दीन मरकज कार्यक्रमाला महाराष्ट्रातील 1062 लोकांची उपस्थिती; 890 जणांचा शोध लागला, 4 जणांना कोरोनाची लागण

एएनआयचे ट्वीट-

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सरकार सतत जनजागृती करूनही नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे राज्यात रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. देशात संचारबंदी असूनही अनेक ठिकाणी लोक खरेदी किंवा इतर कारणांमुळे घराबाहेर पडत आहेत. प्रशासनाकडून कडक कायदे करूनही लोकांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवणे कठीण झाले आहे. दरम्यान, दक्षिण मुंबईतील आतापर्यंत एकूण 191 परिसर सील करण्यात आले आहेत, यात मलबार हिल, वाळकेश्वर, पेडर रोड, बेलासीस रोड, वरळी कोळीवाडा आणि प्रभादेवीचा समावेश आहे.