Coronavirus: मुंबईमधील धारावी झोपडपट्टी मध्ये आढळला कोरोना विषाणूचा रुग्ण; उपचार सुरु, कुटुंबालाही ठेवले वेगळे
भारतात दिवसेंदिवस संक्रमितांची संख्या वाढतच आहे. या साथीच्या आजाराचा सर्वाधिक परिणाम महाराष्ट्र (Maharashtra) वर झाला आहे
सध्या संपूर्ण देशात कोरोना विषाणूने (Coronavirus) कहर माजवला आहे. भारतात दिवसेंदिवस संक्रमितांची संख्या वाढतच आहे. या साथीच्या आजाराचा सर्वाधिक परिणाम महाराष्ट्र (Maharashtra) वर झाला आहे. राज्यात कोरोनाचे 300 हून अधिक रुग्ण आढळले आहेत. अशात राज्यासाठी किंबहुना मुंबई (Mumbai) साठी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. मुंबईमधील सर्वाधिक गर्दीचे ठिकाण, आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावी (Dharavi) येथे कोरोना विषाणूचा एक रुग्ण आढळला आहे. धारावीच्या शाहू नगर (Shahu Nagar) येथील या रुग्णाच्या कोरोना विषाणू चाचणीची सकारात्मक पुष्टी झाली आहे.
एएनआय ट्वीट -
मिळालेल्या माहितीनुसार, या रुग्णाचे वय 56 वर्षे असून, सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याच्या कुटुंबातील 8 ते 10 जणांना वेगळे ठेवण्यात आले आहे. ज्या ठिकाणी हा रुग्ण आढळला आहे ती संपूर्ण जागा सील करण्यात आली आहे. मुंबईमधील धारावी या परिसरात अगदी दाटीवाटीने जवळजवळ 15 लाख लोक राहत आहेत. हा संपूर्ण परिसर 613 हेक्टर एरियामध्ये पसरला आहे. आता इथे कोरोना विषाणूचा रुग्ण आढळल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. धारावी येथे लाखो मजुरी करणारे लोक आणि छोटे व्यापारी राहतात. (हेही वाचा: भारतात 12 तासांत कोरोना व्हायरसच्या 240 रुग्णांची नोंद; देशातील संक्रमणाची एकूण संख्या 1637 वर)
दरम्यान, बुधवारी महाराष्ट्रात कोरोनाचे 33 नवीन रुग्ण आढळले. अशाप्रकारे राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा 335 वर पोहोचला आहे. नवीन रुग्णांमधील 30 रुग्ण हे मुंबईतील असून दोन पुण्यातील आणि एक बुलडाण्यातील रुग्णाचा समावेश आहे. तर देशात अवघ्या 12 तासांत कोरोना विषाणूच्या घटनांमध्ये 240 नी वाढ झाली आहे.