Omicron in Mumbai: चिंता वाढली! मुंबई शहरातील परदेशी न गेलेल्या 141 रहिवाशांना Omicron ची लागण
बीएमसीने गुरुवारी उशिरा जारी केलेल्या प्रसिद्धीमध्ये म्हटले आहे की, केवळ सात रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, परंतु ते ऑक्सिजनवर नाहीत
बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) गुरुवारी सांगितले की, अलीकडेच परदेशवारी न केलेल्या मुंबईतील 141 रहिवाशांना कोरोना व्हायरसच्या ओमायक्रॉन (Omicron) प्रकाराची लागण झाल्याचे आढळले आहे. बीएमसीने सांगितले की, शहरात ओमायक्रॉन प्रकाराची लागण झालेल्या 153 व्यक्तींपैकी केवळ 12 जणांचा आंतरराष्ट्रीय प्रवासाचा इतिहास होता. म्हणजेच शहरातील परदेशात न गेलेल्या 37 टक्के लोकांना ओमायक्रॉनची लागण झाली आहे. तत्पूर्वी संध्याकाळी, महाराष्ट्र सरकारने जारी केलेल्या प्रकाशनानुसार, राज्यात नोंदलेल्या 198 ओमायक्रॉन प्रकरणांपैकी 190 एकट्या मुंबईतील होते.
अद्ययावत BMC डेटानुसार, Omicron प्रकाराने संक्रमित झालेल्या परदेशी प्रवासाचा इतिहास नसलेल्या मुंबईतील लोकांची संख्या 160 वर पोहोचली आहे. शहरातील ओमायक्रॉन प्रकाराची एकूण प्रकरणे 290 वर पोहोचली आहेत. कोणत्याही प्रवासाच्या इतिहासाशिवाय Omicron ची लागण झालेल्या 141 मुंबईतील रहिवाशांपैकी सर्वाधिक 21 K-वेस्ट वॉर्डातील आहेत, ज्यात अंधेरी पश्चिम, जुहू आणि वर्सोवा यांचा समावेश आहे. त्यापाठोपाठ डी वॉर्डमधील काही लोकं आहे, ज्यामध्ये मलबार हिल, महालक्ष्मी आणि तारदेव भागांचा समावेश होतो.
अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी पीटीआयला सांगितले की, ओमायक्रॉन प्रकाराचा सामुदायिक प्रसार झाला आहे की नाही हे तपासण्यासाठी बीएमसी जीनोम सिक्वेन्सिंगसाठी आणखी 375 नमुने शुक्रवारी पाठवेल. पाच ते सहा दिवसांत त्यांचा अहवाल येणे अपेक्षित आहे. अहवाल आल्यानंतरच समुदायाच्या प्रसाराची पुष्टी करता येईल. बीएमसीच्या म्हणण्यानुसार, परदेश प्रवासाचा इतिहास नसलेल्या 141 ओमायक्रॉन पॉझिटिव्ह व्यक्तींपैकी 93 जणांचे पूर्णपणे लसीकरण झाले होते आणि तिघांना कोरोनाव्हायरस लसीचा एकच डोस मिळाला होता. (हेही वाचा: Coronavirus ने वाढवले मध्य रेल्वेचे टेंशन; तिकीट बुकिंग कर्मचाऱ्यालाच कोरोनाची लागण)
त्यापैकी 95 लक्षणे नसलेली, सात मध्यम लक्षणे असलेली आणि 39 मध्ये सौम्य लक्षणे असणारी होती. बीएमसीने गुरुवारी उशिरा जारी केलेल्या प्रसिद्धीमध्ये म्हटले आहे की, केवळ सात रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, परंतु ते ऑक्सिजनवर नाहीत. दरम्यान, मुंबई आणि इतर शहरांनी नवीन वर्षाच्या पार्ट्या आणि सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात एकत्र येण्यापासून रोखण्यासाठी नवीन निर्बंध लादले आहेत. सर्व प्रमुख शहरे आणि रेस्टॉरंट्समध्ये रात्रीचा कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.