महाराष्ट्रातील पिकांच्या नुकसानीचे 'फोटो' काढणार अधिकारी; या आधारे शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई
याशिवाय आता सोमवारपासून अधिवेशन सुरू होत असून त्यापूर्वी पिकांच्या नेमक्या स्थितीची पाहणी करण्यासाठी कृषिमंत्री अब्दुल सत्तार विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत.
महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकरी सातत्याने सरकारकडे नुकसान भरपाईची याचना करत आहेत. अनेक जिल्ह्यांत पिकांचे पंचनामे केले जातात, मात्र मदतीची रक्कम शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नसल्याचे प्रकार समोर आले आहेत. म्हणूनच आता राज्याचे नवे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी पिकांच्या नुकसानीचा पंचनामा करून वरिष्ठ अधिकाऱ्यांना वेळेत सर्व प्रक्रियेची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय त्यांनी अधिकाऱ्यांना पिकांच्या नुकसानीचे फोटो काढण्यास सांगितले आहे. त्या आधारे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाईल.
दरवर्षी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नसल्याच्या तक्रारी येत असल्याचे कृषीमंत्री म्हणाले. पुढे त्यांना सांगितले की, राज्यात दरवर्षी किमान लाखो शेतकरी मदतीशिवाय राहतात. यंदा असे होऊ नये त्यामुळे योग्यवेळी पंचनामे करण्यात यावेत याची काळजी घेतली जाईल. अब्दुल सत्तार यांनी पंचनामा करणाऱ्या अधिकाऱ्यांना पंचनामा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पिकाच्या नुकसानीसह छायाचित्र काढणे बंधनकारक केले आहे.
कृषी खात्याचा पदभार स्वीकारल्यानंतर अब्दुल सत्तार प्रथमच विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. या दरम्यान ते स्वतः शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. सत्तार हे नागपूर, वर्धा, अमरावती या जिल्ह्यातील पिकांची पाहणी करतील. यासोबत ग्रामपंचायतींना किती शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण झाले, किती पिकांचे नुकसान झाले, याची संपूर्ण माहिती द्यावी लागणार आहे. शेतकऱ्यांच्या समस्या आणि त्यांना नुकसानभरपाई का मिळाली नाही, याचीही माहिती द्यावी लागणार आहे. (हेही वाचा: देशभरात अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस, उत्तराखंड, ओडीशा, हिमाचल प्रदेश आदि राज्यांमध्ये महापूरसदृश्य स्थिती)
कृषिमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर अब्दुल सत्तार यांचा हा पहिलाच विदर्भ दौरा आहे. याशिवाय आता सोमवारपासून अधिवेशन सुरू होत असून त्यापूर्वी पिकांच्या नेमक्या स्थितीची पाहणी करण्यासाठी कृषिमंत्री अब्दुल सत्तार विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. मदत रकमेचे वाटप नेमके केव्हापासून सुरु होणार याबाबत सोमवारी सभागृहात घोषणा होणार असल्याचे सत्तार यांनी नागपुरात सांगितले आहे. आता प्रत्यक्षात मदतीची रक्कम शेतकऱ्यांना मिळणार की नाही हे पाहावे लागेल.