मोठी घोषणा: आता रस्तेमार्गाने मुंबई ते दिल्ली अंतर पार होणार फक्त 12 तासांत; पहा काय असेल मार्ग

बुलेट ट्रेनला टक्कर देणाऱ्या या भव्य द्रुतगती महामार्गाचे काम लवकरच सुरू होणार

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo credit : Youtube)

मुंबई ते दिल्ली (Mumbai to Delhi) हे तब्बल 1400 किलोमीटरचे अंतर रस्तेमार्गाने आता फक्त 12 तासांत पार करणे शक्य होणार आहे. बुलेट ट्रेनला टक्कर देणाऱ्या या भव्य द्रुतगती महामार्गाचे काम लवकरच सुरू होणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली. आज मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग 848 वरील वडपे ते ठाणे या सुमारे 23 किमी अंतराचे आठ पदरीकरण, शहापूर ते खोपोली या 91 किमी रस्त्याचे चार पदरीकरण या कामांचे ई भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या हस्ते पार पडले या प्रसंगी ते बोलत होते.

12 तासांत मुंबई ते दिल्ली अंतर कापणारा हा भव्य द्रुतगती महामार्गाचा प्रकल्प तब्बल 1 लाख कोटी रुपयांचा असणार आहे. या प्रकल्पाची लवकरच सुरुवात होईल. यामुळे एक्‍सप्रेस वेच्या आजूबाजूच्या प्रदेशाचा मोठा विकास होणार आहे. या प्रसंगी ठाणे जिल्ह्यातील 8 जेट्टींच्या कामांसाठी 100 कोटीस मंजुरी दिल्याची घोषणाही त्यांनी केली. दरम्यान मुंबई शहरातील वाढत्या ट्राफिकच्या समस्या पाहता पुढील काळात जलवाहतुकीवर भर दिला जाणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. (हेही वाचा : लवकरच रस्ते अपघातांमध्ये अ‍ॅपच्या मदतीने एका क्लिकवर मिळणार Ambulance ची सेवा)

नव्या योजना –

ठाणे-वडपे महामार्ग

शहापूर-मुरबाड-कर्जत-खोपोली राष्ट्रीय महामार्ग

भिवंडी-कल्याण-बदलापूर मेट्रो

माणकोली, दुर्गाडी, मोठागाव, रांजनोली पुल

ठाणे-वसई जलमार्ग

मुंबई दिल्ली मार्ग - हा महामार्ग तब्बल 12 पदरी असणार आहे. या महामार्गाचा मार्ग, गुडगाव-जयपूर-सवाई माधोपुर-अलवार-रतलाम-वडोदरा-मुंबई असा निश्चित केला असून हा भिवंडीतून देखील जाणार आहे. या महामार्गाचा फायदा या भागातील नागरिकांनादेखील होणार आहे. वडोदरा ते मुंबई या टप्प्यासाठी 44 हजार कोटींच्या निविदेसही मंजुरी मिळाली आहे.