IPL Auction 2025 Live

महाराष्ट्र विधानसभेत नसल्याची खंत आयुष्यभर कायम राहील, पण भाजपाचा 140 जागांसह विजय निश्चित: एकनाथ खडसे

तसेच उद्याच्या निवडणूक निकालात १४० वर जागांनी भाजपाचा विजय होणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Eknath Khadse | (Photo Credits: Facebook, File Photo)

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Elections 2019) यंदा महत्वाच्या मतदारसंघातून अनेक मातब्बर मंडळी रिंगणात उतरली आहेत तर निवडणुकीपूर्वी उमेदवारी जाहीर करतानाच काही दिग्गजांना त्यांच्या पक्षाकडून डच्चू देण्यात आला होता. या वगळलेल्या उमेदवारांच्या यादीमध्ये विनोद तावडे (Vinod Tawde), एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांची नावे तर अगदी अनपेक्षित होती. मात्र त्यावेळेस या मंडळींनी कोणतेही विरोधी विधान न देता मौन पाळले होते. या एकूणच प्रकारावर भाजपाचे नेते खडसे यांनी आता भाष्य केले आहे. आजवर ज्या विधानसभेत सत्ताधाऱ्यांना सळो की पळो करून सोडले, जिथे भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे उघड करून विरोधकांची कोंडी केली, दलित, ओबीसी, अल्पसंख्याक, महिला आणि बालकांवरील अत्याचाराला ज्या वाचा फोडण्याचे काम केले त्याच विधानसभेत नसणे ही खंत मला आयुष्यभर बोचत राहील अशा शब्दात खडसे यांनी खेद व्यक्त केला. मात्र सोबतच उद्याच्या निवडणूक निकालात भाजपाचा (BJP)  140 जागांसह विजय निश्चित असलयाचे सुद्धा ते म्हणाले.

विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीचा अर्ज भरण्याच्या तारखेपर्यंत एकनाथ खडसे यांच्या नावाच्या बाबत संभ्रम होता. कधी खडसे यांच्या पत्नी तर कधी मुलगी रोहिणी यांच्या नावांची देखील त्यावेळेस चर्चा होती. अखेरीस मुक्ताईनगर येथून रोहिणी खडसे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाला मात्र एकनाथ खडसे यांना उमेदवारीपासून वेगळेच ठेवण्यात आले होते.

खडसे यांनी माध्यमांशी बोलताना भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्याविषयी एक आठवण देखील सांगितली. महाजन यांनी माझ्या मतदारसंघात सभा घेतली होती. ज्यात कुंकुवाविना सुहासिनी जशी कल्पना करणं कठिण आहे, तसंच खडसेशिवाय विधानसभा ही कल्पनाही सहन होत नाही, असे म्हंटले होते हे शब्द आपल्याला वारंवार आठवत असल्याचे देखील खडसे म्हणाले. यंदाच्या निवडणूक सत्रात आपल्याला राज्यभर प्रचार आणि एकूण प्रक्रियेत प्रत्यक्ष सहभाग घेता न आल्याची खणत आज खडसे यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीच्या निकालापूर्वी भाजपचा उत्साह शिगेला, विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी 5 हजार लाडूंचे वाटप

दरम्यान, एकनाथ खडसे यांनी राज्यात पुन्हा भाजप-शिवसेना महायुतीचंच सरकार येणार असल्याची भविष्यवाणी वर्तवत रोहिणी खडसे यांच्या विजयावर देखील विश्वास दर्शवला.