No Bomb Threats in Mumbai: मुंबईत बॉम्बची कोणतीही धमकी नाही, शहर सुरक्षित आहे; दिवाळीपूर्वी मुंबई पोलिसांचे आश्वासन
नागरिकांनी न घाबरता दिवाळी साजरी करावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
No Bomb Threats in Mumbai: बॉम्बची धमकी (Bomb Threats) देणाऱ्या दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये, मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) दोन जणांना अटक केली आहे. अशा प्रकारच्या धमकीच्या कॉल्सच्या अलीकडच्या घटनांनंतर, मुंबई पोलिसांनी शुक्रवारी एक निवेदन जारी करून असा दावा केला आहे की असे कॉल समाजात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने केले जात आहेत. सुरक्षेच्या पुरेशा उपाययोजना करण्यात आल्या असून संपूर्ण शहरात बंदोबस्त व जागरुकता ठेवली जात असल्याची ग्वाही पोलिसांनी दिली. नागरिकांनी न घाबरता दिवाळी साजरी करावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
गुरुवारी एका कॉलरने पोलिसांना डायल करून वाकोला येथील ग्रँड हयात हॉटेलमध्ये बॉम्ब असल्याची माहिती दिली. या प्रकरणातील आरोपीला वाकोला पोलिसांनी अटक केली असून त्याने बॉम्बच्या धमकीबाबत फोन करत असताना तो दारूच्या नशेत होता. त्याने यापूर्वीही असे खोटे फोन केले आहेत. यापूर्वी त्याने मुंबई विद्यापीठात बॉम्बस्फोट घडवून आणले जातील असे सांगितले होते. त्याच्यावर यापूर्वीच गुन्हा दाखल करण्यात आला होता. (हेही वाचा -Mumbai Diesel Theft: पंपिंग मशीनमध्ये डिझेल चोरी केल्याप्रकरणी रेल्वे कंत्राटदारासह जेसीबी ऑपरेटराला अटक)
मुंबईतील अनेक महत्त्वाच्या ठिकाणी बॉम्बस्फोटांबाबत मंगळवारी रात्री मुंबई पोलिसांच्या हेल्पलाइनवर कॉल करणाऱ्या आणखी एका आरोपीलाही अटक करण्यात आली आहे. फोनवर, कॉलरने दावा केला की, मुंबईतील इन्फिनिटी मॉल अंधेरी, पीव्हीआर मॉल जुहू आणि सहारा हॉटेल विमानतळावर स्फोट होणार आहेत. कॉल आल्यानंतर लगेचच सुरक्षा वाढवण्यात आली. त्यानंतर सीआयएसएफ आणि बीडीडीएससह सहार विमानतळ पोलिस, जुहू, आंबोली आणि बांगूर नगर पोलिस स्टेशनची टीम तैनात करण्यात आली.
या वारंवार मिळणाऱ्या फसव्या बॉम्बच्या धमक्यांबाबत, मुंबई पोलिसांनी शुक्रवारी एक निवेदन जारी केले, ज्यात म्हटले आहे की, "शहरात बॉम्बच्या धमक्यांबाबत अशी कोणतीही परिस्थिती नाही आणि नागरिकांना विनंती करण्यात येते की त्यांनी अशा अफवांना बळी पडू नये. असे बनावट कॉल्स समाजात भीती निर्माण करण्याच्या उद्देशाने केले जात आहेत. मुंबईत अशा प्रकारची परिस्थिती अस्तित्वात नाही. तसेच मुंबई पोलिसांकडून संपूर्ण शहराच्या सुरक्षेसाठी सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मुंबई पोलिस दल सक्षम आहे. त्यामुळे नागरिकांनी शांतीने दिवाळी साजरी करावी, असे निवेदनात म्हटले आहे.