Nitesh Rane On Sanjay Raut: 'संजय राऊत राष्ट्रवादीत जाणार', भाजप आमदार नितेश राणे यांचा दावा
उद्धव ठाकरेंना एकटं पाडण्याचा राऊतांचा कट आहे, असाही आरोप नितेश राणेंनी राऊतांवर केला आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात आता पुन्हा एकदा एक मोठा भूकंप होणार असल्याचा दावा एका भाजप (BJP) नेत्यानं केला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) 10 जून किंवा त्याआधीच राष्ट्रवादीत (NCP) प्रवेश करणार असल्याचा दावा भाजप नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केला आहे. तसेच, संजय राऊत हे शरद पवार (Sharad Pawar) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट होऊ देत नाहीत. उद्धव ठाकरेंना एकटं पाडण्याचा राऊतांचा कट आहे, असाही आरोप नितेश राणेंनी राऊतांवर केला आहे.
नितेश राणे म्हणाले की, "मुंबईच्या व्रजमूठ सभेआधी मी सांगितलं होतं की, बिकेसीमध्ये होणारी महाविकस आघाडीची शेवटची सभा आहे. परंतु, लोकांनी मला हलक्यात घेतलं. परंतु, काहीच दिवसांत महाविकास आघाडीकडून सभा रद्द करण्यात आल्याचं सांगण्यात आलं. आता ते भाकीत जसं खरं ठरलं तसचं आता संजय राजाराम राऊत हे 10 जून किंवा त्याआधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. त्याबाबत त्यांच्या बैठका झाल्या आहेत."
"संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांच्या घरात भांडणं लावली आहेत.", असं नितेश राणे म्हणाले. पवार यांच्या राजीनाम्याच्या दिवशी सर्वांनी फोन करून पवारांना विनंती केली की, तुम्ही राजीनामा देऊ नका. परंतु उद्धव ठाकरे यांनी त्यांचाशी संपर्क केला नाही. अशी माहिती होती की, उद्धव ठाकरे शरद पवार यांना भेटायला जाणार होते. परंतु, ते गेले नाहीत. किंबहुना संजय राऊत यांनी भेट घेऊ दिली नाही." असे नितेश राणे यांनी म्हटले आहे.