Lok Sabha Election 2024: अजित पवार यांच्या गटातील पहिला आमदार गळाला? आज Sharad Pawar यांच्या पक्षात प्रवेशाची शक्यता; जाणून घ्या नाव
कोणताही वेळ न दवडता आजच त्यांचा पक्षप्रवेश पार पडणार असल्याचे समजते.
Ahmednagar South Lok Sabha Constituency: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंड करुन अजित पवार यांनी भाजपसोबत हातमिळवणी केली आणि आपले उपमुख्यमंत्री पद कायम ठेवले. शिवाय, पक्षाचा अधिकृतरित्या ताबाही मिळवला. असे असताना सत्ता आणि पक्ष दोन्ही मिळाल्याने बऱ्यापैकी शक्तीशाली असलेल्या अजित पवार यांना पहिलाच धक्का आज बसण्याची शक्यता आहे. पक्षाचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) हे शरद पवार (Sharad Pawar) यांच्या पक्षाच्या वाटेवर असल्याची विश्वसनीय सूत्रांकडून समजते. कोणताही वेळ न दवडता आजच त्यांचा पक्षप्रवेश पार पडणार असल्याचे समजते.
भाजपकडून खासदार सुजय विखे पाटील यांना उमेदवारी
निलेश लंके हे अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याच इच्छुक आहेत. अजित पवार यांचा पक्ष महायुतीत आहे आणि महायुतीच्या जागावाटपात हा मतदारसंघ भाजपके आहे. भाजपने जाहीर केलेल्या मतदार यादीमध्ये या ठिकाणी विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे सहाजिकच अजित पवार गटास येथे उमेदवार उभा करता येणार नाही. या पार्श्वभूमीवर निलेश लंके वेगळा मार्ग निवडण्याची शक्यता आधीपासूनच वर्तवली जात होती. त्यावर आज शिक्कामोर्तब होण्याची चिन्हे आहेत. (हेही वाचा, Vijay Shivtare On Ajit Pawar: अजित पवार 'नीच आणि उर्मट', एकनाथ शिंदे यांच्या जवळच्या नेत्याकडून जहरी टीका; बारामतीतून अपक्ष लढणार)
महायुतीमध्ये दादा गटाची कोंडी
लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमावर भाजपने आतापर्यंत दोन उमेदवार याद्या जाहीर केल्या आहेत. त्यापैकी पहिल्या यादीत महाराष्ट्रातील एका जागेचा समावेश नव्हता. दुसऱ्या यादीत मात्र महाराष्ट्रातील जागांचा समावेश आहे. त्यापैकी अनेक जागांवर विद्यमान खासदारांना संधी देण्यात आली आहे. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातही भाजपने उमेदवार जाहीर केला आहे. या ठिकाणी सुजय विखे पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याने इच्छूक लंके इतर पर्यायांचा विचार करु पाहात आहेत. (हेही वाचा, Sharad Pawar : 'अधिकार असतानाही कधीच सुप्रियाला मंत्री करण्याचा विचार केला नाही', शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट)
महाविकासआघाडीचे जागावाटप लटकले
दरम्यान, काँग्रेस पक्षानेही आपली पहिली उमेदवार यादी जाहीर केलीआहे. ज्यामध्ये महाराष्ट्रातील जागांचा समावेश नाही. महाविकासआघाडीच्या जागावाटपांचा तिढा अद्यापही सुटला नसल्याने पेच कायम आहे. शिवसेना (UBT), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि काँग्रेस यांच्यात प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्यावरुन चर्चा सुरु आहेत. त्यामुळे कोणास किती जागा यावर अद्याप तरी शिक्कामोर्तब झाले नाही. असे असले तरी उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांनी काही जागांवरील उमेदवार जाहीर केले आहेत.
केंद्रीय निवडणूक आयोगाने अद्यापही निवडणूक कार्यक्रम जाहीर केला नाही. मात्र, असे असले तरी राजकीय पक्ष मात्र जोरदार कामाला लागले आहेत. अद्यापही काही जागांवरील उमेदवार शोधणे आणि चर्चा करणे हे राजकीय पक्षांकडून सुरुच आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे.