IPL Auction 2025 Live

New Restrictions in Maharashtra: राज्यात कोरोना विषाणूबाबत नवीन निर्बंध सुरु; नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी राज्यातील जिल्हा प्रशासनाला परिस्थितीबाबत अधिक दक्ष राहण्यास सांगितले आहे.

CM Uddhav Thackeray (Photo Credits: ANi)

राज्यात वाढत असलेल्या कोरोना विषाणू (Coronavirus) संसर्गाच्या पार्श्वभुमीवर आज रात्रीपासून कडक निर्बंध लागू झाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी राज्यातील जिल्हा प्रशासनाला परिस्थितीबाबत अधिक दक्ष राहण्यास सांगितले आहे. आज ते सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त तसेच पोलीस अधिकाऱ्यांसमवेत आयोजित बैठकीत बोलत होते. यावेळी ते म्हणाले, ‘गेल्या वेळेस आपण कोरोनाचा संसर्ग रोखून दाखविला होता, मात्र आत्ताची परीक्षा अधिक कठीण व आव्हानात्मक आहे, त्यामुळे ‘ब्रेक दि चेन’ मधील निर्बंधांची अतिशय काटेकोरपणे अंमलबजावणी होईल याकडे सर्व जिल्हाधिकारी तसेच पोलीस यंत्रणेने लक्ष द्यावे. नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करा. कोणत्याही परिस्थितीत आपल्याला गाफील राहून चालणार नाही आणि संसर्ग आणखी फैलावलेला परवडणार नाही.’

मुख्यमंत्री म्हणाले की, कोरोना विषाणूचे म्युटेशन झालेले आपल्याकडील नमुन्यांमध्ये आढळले आहे. गेल्या वर्षीपेक्षा संसर्गाचा वेग खूप जास्त आहे, तरुण पिढी जास्त संसर्गित झाली आहे. ऑक्सिजन उपलब्ध करून घेण्यासाठी आपण युद्ध पातळीवर प्रयत्न करीत आहोत. जिल्ह्यांच्या डॉक्टर्सनी बदललेल्या उपचार पद्धतींबाबत नेमकेपणाने काय करायचे ते राज्याच्या तज्ज्ञ टास्क फोर्सकडून समजून घ्यावे.

ऑक्सिजनचा उचित व योग्य वापर तसेच रेमडीसीव्हीरसंदर्भात काळजीपूर्वक पाऊले उचलावी लागतील. तसेच आपण उभारलेल्या जम्बो सुविधा या येणारा पावसाळा, वादळे लक्षात घेऊन सुरक्षित आहेत किंवा नाही ते तपासून घ्यावे. सर्व रुग्णालयांचे अग्नि सुरक्षा ऑडीट त्वरेने पूर्ण करून घ्यावे, यात कोणताही निष्काळजीपणा ठेवू नये. सूक्ष्म आणि लहान कंटेनमेंट क्षेत्रांकडे विशेष लक्ष द्यावे असेही मुख्यमंत्री म्हणाले. (हेही वाचा: महाराष्ट्रातील 361 कोरोना विषाणू नमुन्यांपैकी 61% मध्ये आढळला 'डबल म्यूटंट'; जानेवारी ते मार्च दरम्यान गोळा केले होते नमुने)

जीवनावश्यक आणि आवश्यक सेवा सुविधा बंद केलेल्या नाहीत मात्र याचा अर्थ तिथे नियम मोडले जात आहेत, किंवा गर्दी होत आहे असे दृश्य दिसता कामा नये. अन्यथा त्या सुविधा स्थानिक प्रशासनाने बंद कराव्यात, अशा स्पष्ट सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. विवाह समारंभ हे कोरोना संसर्गास मोठ्या प्रमाणावर जबाबदार असल्याचे लक्षात आले आहे, त्यादृष्टीने यावेळेस सर्व नियम व्यवस्थित पाळले जात आहेत किंवा नाहीत हे जिल्हा व पोलीस प्रशासनाने पाहावे असेही ते म्हणाले.