New Coronavirus Strain in Pimpri-Chinchwad: पिंपरी चिंचवड शहरात इंग्लंडमधून परतलेल्या तिघांना कोरोना व्हायरस यूके स्ट्रेन संसर्ग

त्यातील 4,663 जणांचा मृत्यू झाला आहे. तर सुमारे 1,73,333 जणांना कोरोनामुक्त झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज दिवसभरात कोरना व्हायरस संक्रमित 387 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले.

Coronavirus | Representational Image (Photo Credits: Pixabay)

राज्यातील कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमितांची संख्या हळूहळू कमी होत असली तरी इंग्लंडमध्ये (England) आढळलेल्या नव्या कोरोना व्हायरस स्ट्रेनमुळे चिंता वाढली आहे. राज्यात या नव्या स्ट्रेन (New Coronavirus Strain) संक्रमितांची संख्या कमी असली तरी ती वाढते आहे. पिंपरी चिंचवड (Pimpri-Chinchwad) शहरात आज (गुरुवार, 7 जानेवारी) कोरोनाच्या नव्या स्ट्रेनने संक्रमित असलेले तीन रुग्ण (New Coronavirus Strain in Pimpri-Chinchwad) आढळले. हे तिघेही इंग्लंडवरुन नुकतेच परतले होते. पिंपरी चिंचवड महापालिका (Pimpri-Chinchwad Municipal Corporation) आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार तिघांवरही उपचार सुरु आहेत. सध्या त्यांची प्रकृती ठिक आहे. आणखी एका प्रवाशाला या नव्या स्ट्रेनचा संसर्ग झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. परंतू, त्याचा चाचणी अहवाल येणे अद्याप बाकी आहे.

प्राप्त माहितीनुसार, इंग्लडमधून भारतात आलेले एक विमान मुंबई विमानतळावर उतरले होते. या विमानात 268 प्रवासी होते. या प्रवाशांचा शोध महानगरपालिकेकडून सुरु होता. दरम्यान, ज्यांचा शोध लागला त्यापैकी सात जणांचे नमुने पुणे येथील NIV कडे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी तिघे जण यूके स्ट्रेन करोनाबाधित असल्याचे पुढे आले. तर उर्वरीत तिघांची चाचणी निगेटीव्ह आली. एकाचा अहवाल येणे बाकी आहे. संक्रमितांवर उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती नियंत्रणात असून ठिक आहे. (हेही वाचा, Covid-19 Vaccine Update: भारत बायोटेक लवकरच सुरु करणार कोविड-19 वरील Nasal Vaccine च्या ट्रायल्स)

पिंपरी चिंचवड शहरातील एकूण कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या 97, 442 इतकी झाली आहे. त्यापैकी 93, 997 जणांनाआतापर्यंत डिस्चार्ज देण्यत आला आहे. आज दिवसभरात 150 जण कोरोना व्हायरस संक्रमित आढळून आले. तर 91 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. पिंपरी चिंचवड महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार शहरात सध्या 639 कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

पुणे शहरातील एकूण कोरोना व्हायरस संक्रमितांची आतापर्यंतची संख्या 1, 80,674 इतकी झाली आहे. त्यातील 4,663 जणांचा मृत्यू झाला आहे. तर सुमारे 1,73,333 जणांना कोरोनामुक्त झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज दिवसभरात 387 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले. तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती पुणे महापालिकेने दिली आहे.